
आता ग्राहकांना धान्य घेण्यासाठी सरकारी रेशन दुकानांसमोर लांबच्या लांब रांगेत उभा राहण्याची गरज नाही. तसेच कमी रेशन मिळाल्याची तक्रार करण्याचीही परिस्थिती उद्भवणार नाही. हरियाणा सरकार आता ग्राहकांसाठी 'ग्रेन एटीएम' (Grain ATM) उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. पायलट प्रकल्प म्हणून गुरुग्राम (Gurugram) जिल्ह्यात देशातील पहिले धान्य एटीएम सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, 'ग्रेन एटीएम' बसविल्यामुळे सरकारी दुकानांतून रेशन घेणाऱ्या लोकांचा वेळ आणि धान्याच्या मोजमापा संबंधित सर्व तक्रारी दूर होतील.
ते पुढे म्हणाले की, हे मशीन बसविण्याचे उद्दीष्ट 'राईट क्वांटिटी टू राईट बेनिफिशरी' हे आहे. याचा केवळ ग्राहकांनाच फायदा होणार नाही तर, सरकारी आगारांवर धान्य कमतरतेची समस्याही दूर होईल. सोबतच सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत अधिक पारदर्शकता येईल. गुरुग्राम जिल्ह्यातील फर्रुखनगरमध्ये हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यभरातील सरकारी आगारांवर या अन्न-पुरवठा मशीन बसवण्याची योजना आहे.
ही एक स्वयंचलित मशीन आहे, जे बँकेच्या एटीएमच्या धर्तीवर कार्य करते. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापित झालेल्या या मशीनला ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी, धान्य वितरण मशीन असे म्हणतात. या कार्यक्रमाशी संबंधित अधिकारी अंकित सूद यांचे म्हणणे आहे की, या मशीनमध्ये धान्य मोजण्याबाबत होणारी त्रुटी अगदी नगण्य आहे. एका वेळी, हे मशीन पाच ते सात मिनिटांत 70 किलो धान्य काढू शकते. (हेही वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवण्यास केंद्राची मंजूरी, कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा)
टच स्क्रीनसह मशीनमध्ये बायोमेट्रिक मशीन देखील स्थापित केले आहे, जेथे लाभार्थ्यास आधार किंवा रेशन कार्डचा क्रमांक द्यावा लागेल. बायोमेट्रिकद्वारे तपासणी झाल्यावर, सरकारने लाभार्थ्यांना विहित केलेले धान्य मशीन अंतर्गत बसविलेल्या बॅगमध्येच भरले जाईल. गहू, तांदूळ आणि बाजरी असे तीन प्रकारचे धान्य या मशीनद्वारे वितरीत केले जाऊ शकते.