आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकार 2.0 चा दुसरा अंतरीम अर्थसंकल्प (Budget 2019) सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी 20 रुपयांचे नाणे (20 Rs Coin) चलनात येणार असल्याची घोषणा केली आहे. सोबतच सध्या अस्तित्वात असलेली 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणीही नव्या स्वरूपात चलनात येणार आहेत. अंध व्यक्तीसुद्धा ही नाणी वापरू शकतील अशी त्यांची रचना असणार आहे. सध्या, 50 पैसे, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये यांची वेगवेगळ्या आकाराची, रचनेची आणि डिझाइनची नाणी चलनात आहेत.
याआधी मार्चमध्ये आरबीआय (RBI) ने अशा प्रकारचे 20 रुपयांचे नाणे चलनात येणार असल्याची माहिती दिली होती. हे नाणे अंध लोकांनाही वापरता यावे म्हणून त्याची खास रचना असणार आहे. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, या नाण्याच्या बाहेरील बाजूस 65 टक्के तांबे, 15 टक्के झिंक, 20 टक्के निकेल असेल तर, आतील बाजूस 75 टक्के तांबे, 20 टक्के झिंक आणि 5 टक्के निकेल असेल. नाणे 27 मिलिमीटर व्यासाचे आणि 8.54 ग्रॅम वजनाचे असेल. या नाण्याला 12 कडा असतील. नाण्याच्या एका बाजूस अशोक स्तभाचं चिन्ह व त्याखाली सत्यमेव जयते असे लिहिले असेल. उजव्या बाजूस भारत व डाव्या बाजूस इंडिया लिहिलेले असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूस नाण्याचे मूल्य नमूद असेल आणि धान्याच्या लोंब्यांचे चित्र असेल.(हेही वाचा: चलनात असणारी 50 पैशांपासून 10 रुपयांपर्यंतची सर्व नाणी वैध; RBI चे स्पष्टीकरण)
दरम्यान, 10 वर्षांपूर्वी मार्च 2009 मध्ये रिझर्व बॅंक ऑफ इंडिया ने 10 रुपयांचे नाणे जारी केले होते. तेव्हा पासून आतापर्यंत 14 वेळा नाण्याची डिझाइन बदलली आहे व ही सर्व नाणी व्यवहारात चालणार असल्याची माहिती आरबीआय ने दिली होती. आता हे नवे 20 रुपयांचे नाणे कधी बाजारात येईल याबाबत उत्सुकता असणार आहे.