रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी एक परिपत्रक जारी करून हे स्पष्ट केले आहे की, बँकेत नाणी (Coins) बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकांना बँक नकार देऊ शकत नाहीत, त्यांना ही नाणी स्वीकारणे बंधनकारक असणार आहे. सोबतच सध्या बाजारात असणारी सर्व नाणी कायदेशीररित्या वैध असल्याचा निर्वाळाही देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या चलनात असलेल्या 50 पैशांपासून ते 10 रुपयांपर्यंतची सर्व नाणी व्यवहारात वापरण्यात येणार आहेत. भारतीय रिझर्व बँकेला अशी तक्रार मिळाली होती की, देशातील काही भागातील व्यापारी आणि दुकानदार काही प्रकारची नाणी घेण्यास नकार देत आहेत. त्यावर आरबीआयने आपले मत स्पष्ट केले आहे.
बाजारामध्ये चालत असणाऱ्या विविध प्रकारच्या नाण्यांवर आरबीआयने स्पष्ट केले आहे की, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांबाबत वेळोवेळी विविध डिझाइनची आणि वैशिष्ट्यपूर्ण नाणी जारी केली जातात. त्यामुळे अशा प्रकारची नाणी चलनात नाही ही अफवा आहे, त्यावर विश्वास ठेऊ नका. अशा प्रकारची ही सर्व नाणी वैध आहेत. त्यामुळे आता बँकदेखील अशा प्रकारच्या नाण्यांना मना करू शकणार नाही.
(हेही वाचा: दहा रुपयांचे नाणे वैध! आरबीआयने 14 प्रकारच्या नाण्यांबाबत दिले स्पष्टीकरण)
दरम्यान नुकतेच शिर्डीच्या साई मंदिरातीत नाणी स्वीकारण्यास बँकांनी नकार दिला होता. ही नाणी इतक्या जास्त प्रमाणात आहेत की ती ठेवायला जागा नाही असे कारण बँकांनी दिले होते. त्यावर, देणगीच्या स्वरुपात जमा होणारी ही नाणी स्वीकारा असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राष्ट्रीयकृत बँकांना दिला होता.