New Rules from 1st October 2023: प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून अनेक नियम बदलतात. आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून अनेक बदल होणार आहेत. यामध्ये ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील उच्च GST ते डेबिट-क्रेडिट कार्ड नेटवर्क निवडण्याच्या सोयीपर्यंतच्या बदलांचा समावेश आहे. काही बदलांमुळे तुमच्या खिशावरचा भार वाढेल तर काही बदलांमुळे फायदाही होईल.
क्रेडिट-डेबिट कार्ड नेटवर्क मोबाईल नंबरप्रमाणे बदलता येणार -
1 ऑक्टोबरपासून सर्व क्रेडिट, डेबिट आणि प्रीपेड कार्डधारक त्यांचे नेटवर्क बदलू शकतील. हे अगदी मोबाईल नंबरचे नेटवर्क बदलण्यासारखे असेल. नवीन नियमानुसार, व्हिसा कार्डधारक त्यांच्या कार्डसाठी मास्टरकार्ड किंवा रुपे किंवा इतर नेटवर्क निवडू शकतील. तसेच कार्डधारकाच्या क्रेडिट इतिहासात कोणताही बदल होणार नाही. हा बदल लोकांना त्यांच्या आवडीचे नेटवर्क निवडण्यास मदत करेल. बँका आणि वित्तीय कंपन्या त्यांच्या कार्डधारकांना नेटवर्क बदलण्याचा पर्याय प्रदान करतील. भारतात सध्या पाच कार्ड नेटवर्क आहेत. यामध्ये American Express Banking Corp, Diners Club International, Mastercard Asia, NPCI-Rupay आणि Visa Worldwide Pte Ltd यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Exchanging ₹2000 Banknotes New Deadline: 2000 च्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी, बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ - Reserve Bank of India ची माहिती)
परदेशात प्रवास करताना 7 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चावर जास्त कर -
आता परदेशात जाण्यासाठी जास्त पैसे खर्च केल्यास जास्त कर भरावा लागेल. 1 ऑक्टोबरनंतर, 7 लाख रुपयांपेक्षा जास्त परदेशी प्रवासाच्या खर्चावर 20 टक्के TCS (स्रोतवर जमा केलेला कर) भरावा लागेल. त्याचप्रमाणे, RBI च्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत, परदेशात पैसे पाठवण्यासाठी 5 टक्क्यांऐवजी 20 टक्के TCS भरावे लागतील. मात्र, परदेशात शिक्षणासाठी किंवा उपचारांसाठी 7 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवणाऱ्या कर दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय 1 ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे.
सीएनजी-पीएनजी महाग होण्याची शक्यता -
सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी नैसर्गिक वायूची किंमत $9.20 प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट (MMBTU) केली आहे. जी सप्टेंबरमध्ये $8.60 प्रति MMBTU होती. नैसर्गिक वायूची ही किंमत 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. ही वाढ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गॅस वितरण कंपन्या सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवू शकतात.
दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमती वाढणार -
अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी 1 ऑक्टोबरपासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. वाहनाच्या मॉडेलनुसार किंमतीत ही वाढ होणार आहे. म्हणजेच आजपासून ग्राहकांना दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.
पाच वर्षांच्या आरडीवर अधिक व्याज मिळणार -
लहान बचत योजनांचा व्याजदर ऑक्टोबर-डिसेंबर 2023 साठी निश्चित करण्यात आला आहे. पाच वर्षांच्या आवर्ती ठेवीवर (आरडी) व्याज 6.5 टक्क्यांवरून 6.7 टक्के करण्यात आले आहे. म्हणजेच त्याच्या व्याजात 20 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. इतर लहान बचत योजनांवरील व्याजदर सप्टेंबरच्या तिमाहीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे.
बचत योजनांची खाती सक्रिय ठेवण्यासाठी पॅन आणि आधार तपशील देणे बंधनकारक-
देशातील मोठ्या संख्येने लोक पीपीएफ, एनएससी, सुकन्या समृद्धी यासारख्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या बचत योजनांची खाती सक्रिय ठेवण्यासाठी खातेदारांना 30 सप्टेंबरपर्यंत त्यांचा पॅन आणि आधार तपशील देणे बंधनकारक होते. असे न करणाऱ्यांची खाती 1 ऑक्टोबरनंतर निलंबित केली जाऊ शकतात. खातेदार त्यांच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेतून या संदर्भात माहिती मिळवू शकतात.
जन्म प्रमाणपत्राची व्याप्ती वाढेल -
केंद्र सरकारने जन्म आणि मृत्यू नोंदणी कायद्यात सुधारणा केली आहे. सुधारित नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. नवीन नियम लागू झाल्याने जन्म प्रमाणपत्राची व्याप्ती वाढणार आहे. आधार बनवणे, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, मतदार यादीत नाव जोडणे, शैक्षणिक संस्थेत प्रवेश, विवाह नोंदणी आणि सरकारी नोकरी मिळवणे यासाठी जन्म प्रमाणपत्र एकच प्रमाणपत्र म्हणून वैध असेल.