How To Obtain Birth Certificate? आता शाळा प्रवेश, सरकारी नोकऱ्या आणि इतर कामांसाठी जन्म प्रमाणपत्राचा होणार वापर; जाणून घ्या कुठे व कसा कराल अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची यादी
Birth Certificate (Representative Image)

जन्म आणि मृत्यूची नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 हा येत्या 1 ऑक्टोबर 2023 पासून देशभरात लागू होणार आहे. यामुळे आता बर्थ सर्टिफिकेटचे (Birth Certificate) महत्त्व खूप वाढणार आहे. शाळा, महाविद्यालयात प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज, मतदार यादीत नाव जोडणे, आधार नोंदणी, विवाह नोंदणी किंवा सरकारी नोकरीसाठी अर्ज अशा अनेक कामांसाठी तुम्ही जन्म प्रमाणपत्र या एकाच कागदपत्राचा वापर करू शकाल. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर आधारपासून सर्व आवश्यक कागदपत्रे बनवण्यात जन्म प्रमाणपत्राची भूमिका वाढणार आहे.

भारताच्या नागरी नोंदणी प्रणाली (CRS) अंतर्गत, सर्व नागरिकांसाठी जन्म नोंदणी अनिवार्य आहे. जन्म आणि मृत्यूची नोंदणी कायदा, 1969, देशभरात जन्म आणि  मृत्यूची नोंदणी करणे अनिवार्य करते. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे, जी भारताच्या रजिस्ट्रार जनरलने प्रदान केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित त्यांचे नियम तयार करतात.

आता जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 विधेयक 1 ऑगस्ट रोजी लोकसभेत आणि 7 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यानंतर आता केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी करून 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज कुठे व कसा करावा आणि ते कसे मिळवावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (हेही वाचा: कर्ज देण्याबद्दल रिझर्व्ह बँकेकडून मार्गदर्शक तत्वे जारी, मालमत्ता कागदपत्रे मिळविण्यासाठी 30 दिवसांची मर्यादा)

सध्या वय पडताळणी, सामाजिक सुरक्षा लाभांचा दावा करणे, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट यांसारखी कागदपत्रे मिळवणे तसेच शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवणे यासह विविध कारणांसाठी जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे. संबंधित स्थानिक अधिकारी, जसे की शहरी भागातील महानगरपालिका किंवा ग्रामीण भागातील तहसीलदार किंवा ग्रामपंचायत कार्यालय, जन्म प्रमाणपत्र जारी करतात.

जाणून घ्या जन्म प्रमाणपत्र कसे मिळवायचे-

तुम्ही अधिकृत वेबसाइट crsorgi.gov.in द्वारे जन्म प्रमाणपत्र नोंदणी फॉर्म ऑनलाइन मिळवू शकता किंवा मुलाचा जन्म झालेल्या हॉस्पिटलमध्येही तो उपलब्ध असतो.

मुलाच्या जन्माच्या 21 दिवसांच्या आत हा फॉर्म भरणे गरजेचे आहे. ज्यामध्ये तारीख, वेळ, जन्म ठिकाण, पालकांचा आयडी पुरावा आणि नर्सिंग होम तपशीलांसह अचूक तपशील प्रदान करा.

हा फॉर्म सबमिट केल्यावर, रजिस्ट्रार जन्म नोंदी सत्यापित करतो.

सामान्यतः संबंधित अधिकाऱ्यांना जन्म प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सात दिवस लागतात.

आवश्यक कागदपत्रे-

भारतातील जन्म प्रमाणपत्र अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे राज्यानुसार थोडी वेगळी असू शकतात. मुलाचा जन्म रुग्णालयात किंवा नर्सिंग होममध्ये झाला असेल, तर तुम्हाला प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेल्या जन्मपत्राचा पुरावा आवश्यक असेल. दोन्ही पालकांच्या जन्म प्रमाणपत्रांच्या प्रती सामान्यतः आवश्यक असतात. मुलाचे पालक विवाहित असल्यास, त्यांच्या विवाह प्रमाणपत्राची प्रतही आवश्यक आहे. ओळख दस्तऐवज म्हणून तुम्ही आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणतेही सरकारी-जारी फोटो ओळखपत्र सादर करू शकता. पालकांच्या निवासी पत्त्याचा पुरावा देखील आवश्यक असू शकतो, जसे की युटिलिटी बिल किंवा भाडे करार.

जर मुलाचा जन्म रुग्णालयात झाला नसेल तर, ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा एमबीबीएस डॉक्टरांकडून मुलाचे नाव, वडिलांचे नाव, निवासी पत्ता, जन्मतारीख आणि प्राधिकरणाची स्वाक्षरी आणि शिक्का असलेले पत्र स्वीकारले जाऊ शकते. भारताबाहेर जन्मलेल्या मुलांसाठी, जन्म नोंदणी नागरिकत्व कायदा 1955 आणि नागरिक (भारतीय वाणिज्य दूतावासात नोंदणी) नियम, 1956 मधील तरतुदी लागू होतात. जर पालक भारतात परतले असले तर मुलाच्या आगमनाच्या 60 दिवसांच्या आत याची नोंदणी झाली पाहिजे. मुलाचे हक्क आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र नोंदणी आवश्यक आहे.