दिल्लीतील रोहिणी सेक्टर परिसरात कारमध्ये सापडला डॉक्टर आणि त्याच्या मैत्रिणीचा मृतदेह
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

दिल्लीमध्ये रोहिणी सेक्टर 16 भागामध्ये एका कारमध्ये 2 जणांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कारमध्ये रक्ताने भरलेले 2 मृतदेह दिसून आले. या मृतदेहावरून या दोघांची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, हे मृतदेह एका डॉक्टर आणि त्याच्या मैत्रिणीचा आहे. प्रशांत विहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टराचे नाव ओमप्रकाश कुकरेजा (Om Prakash Kukreja) (वय-62) आणि मृत महिलेचे नाव सुदीप्ता मुखर्जी (Sudipta Mukherji) (वय-55) असे आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारमध्ये पोलिसांना एक पिस्तूल सापडली आहे. ही पिस्तूल कुकरेजा यांचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओमप्रकाश यांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली आहे. पोलिसांनी लावलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, ओमप्रकाश यांनी सुदीप्ता यांच्या छातीमध्ये गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडली असावी. इंजिन सुरुच असलेली चारचाकी रस्त्यावर पाहिल्यामुळे पादचाऱ्यांनी गाडीमध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना हे दोन्ही मृतदेह आढळून आले. त्यानंतर या नागरिकांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (हेही वाचा - धक्कादायक! देशात गुन्ह्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल, महाराष्ट्राचा दुसरा नंबर; स्त्रियांसाठीही असुरक्षित राज्य)

मृत ओमप्रकाश कुकरेजा हे 'निर्वाणा' रुग्णालयाचे मालक होते. तसेच सुदीप्ता या निर्वाणा रुग्णालयाच्या संचालिका होत्या. ओमप्रकाश आणि सुदीप्ता यांचे मागील अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुदीप्ता मुखर्जी या ओमप्रकाश यांच्याकडे विवाहाची मागणी करत होत्या. त्यामुळे ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ओमप्रकाश यांच्या मागे त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. तर सुदीप्ता यांच्या मागे त्यांचे पती आणि मुलगा असा परिवार आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.