Zimbabwe: लॉकडाऊनमध्ये मुलींचे 'गरोदर' होण्याचे प्रमाण वाढले; सरकारच्या वाढत्या चिंता, आता पुन्हा सुरु केल्या शाळा
प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीमुळे जगभरातील लोक अनेक समस्यांशी लढा देत आहेत. काही ठिकाणी आर्थिक समस्या आहेत, तर काही ठिकाणी मानसिक समस्या. या साथीमुळे अनेक कुटुंबांनी आपले सदस्य गमावले आहेत. देशाच्या प्रगतीमध्येही ही महामारी अडसर ठरली आहे. या सगळ्यामध्ये झिम्बाब्वेचे (Zimbabwe) सरकार आणि तिथली जनता एका वेगळ्याच समस्येला तोंड देत आहेत. सध्या देशात मुली गर्भवती (Pregnant) होण्याची समस्या निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लोक एकत्र येण्याचे टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयेदेखील बंद करण्यात आली आहेत.

आफ्रिकन देश झिम्बाब्वेमध्येदेखील कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद केली गेली. परंतु त्यानंतर याठिकाणी गर्भधारणेच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले. अल्पवयीन मुली गरोदर होण्याचे प्रमाण वाढल्याने सरकारसमोर नवी समस्या उभी राहिली आहे. यातील अनेक प्रकरणे अवैध संबंधांशी संबंधित आहेत. अशा परिस्थितीत इतर मुलांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी सरकारने 2020 मध्ये कठोर कायदा लागू केला.

या कायद्या अंतर्गत गरोदर मुलींना शाळेत येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे शाळांमधील मुलींच्या गळतीचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले. आता अशा मुलींना शाळेत पाठवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. झिम्बाब्वेमध्ये प्रत्येक तीन मुलींपैकी एका मुलीचा विवाह 18 वर्षांच्या आत होतो. अनियोजित गर्भधारणा, शिथिल कायदे, गरिबी, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा अशा अनेक कारणांमुळे परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे, या देशाने मार्च 2020 मध्ये कडक लॉकडाऊन लागू केला होता. सरकारने शाळा, महाविद्यालये बंद केली होती. नंतर काही दिवसांसाठी ती पुन्हा उघडण्यात आली. त्यावेळीही विशेषतः मुलींकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे गर्भनिरोधक साधने किंवा औषधांपासून मुली लांबच राहिल्या. (हेही वाचा: Africa: विद्यार्थ्याला उत्तम गुण हवे असल्यास Sexual Relationship ठेवावे, युनिव्हर्सिटीच्या 5 प्रोफेसरांना सुनावली दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा)

दरम्यान, 2018 मध्ये, झिम्बाब्वेमध्ये गर्भधारणेमुळे सुमारे 3,000 मुलींनी शाळा सोडली. 2019 मध्ये ही संख्या तुलनेने स्थिर राहिली. 2020 मध्ये ही संख्या वाढली आणि 4,770 गरोदर विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले. 2021 मध्ये हा आकडा गगनाला भिडला. महिला व्यवहार मंत्री सिथेम्बिसो न्योनी यांच्या म्हणण्यानुसार, वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत सुमारे 5,000 विद्यार्थिनी गर्भवती झाल्या होत्या.