Uzbekistan: गाम्बियानंतर आता उझबेकिस्तानमध्ये भारतातील Cough Syrup प्यायल्याने 18 मुलांचा मृत्यू; तपास सुरू, WHO करत आहे मदत
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

पश्‍चिम आफ्रिकन देश गांबियातील मुलांच्या मृत्यूचा वाद अद्याप मिटलेला नाही, अशात आता उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने भारतीय औषध कंपनीविरुद्ध मोठा आरोप केला आहे. भारतामध्ये बनवलेले सिरप प्यायल्याने देशातील 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझबेकिस्तानने केला आहे.

उझबेकिस्तानमधील स्थानिक न्यूज वेबसाइट AKI.com ने अहवाल दिला आहे की, उत्तर प्रदेशस्थित मेरियन बायोटेकने निर्मित (Marion Biotech Limited) 'डॉक-1 मॅक्स' ही गोळी आणि सिरपचे (Dok 1 Max Syrup) सेवन केल्यानंतर अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. या मुलांना श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मेरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उझबेकिस्तानमध्ये 2012 मध्ये नोंदणीकृत झाले. आता प्रेस अहवालात उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्राथमिक प्रयोगशाळेच्या अभ्यासाचा हवाला देण्यात आला आहे, ज्यामध्ये डॉक-1 मॅक्स सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल- एक घातक रसायन- ची उपस्थिती दर्शविली गेली आहे. विशेष बाब म्हणजे गांबियातील मुलांच्या मृत्यूसाठीही याच रसायनाला जबाबदार धरण्यात आले होते. आता डब्ल्यूएचओने सांगितले की, ते उझबेकिस्तानमधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि पुढील तपासात मदत करण्यास तयार आहेत.

हॉस्पिटलायझेशनच्या 2-7 दिवस आधी मुलांनी हे औषध 2.5-5 मिली 3-4 वेळा घेतले होते. हे प्रमाण मुलांसाठी औषधाच्या प्रमाणित डोसपेक्षा जास्त आहे. डॉक-1 मॅक्स या औषधाच्या गोळ्या आणि सिरप देशातील सर्व फार्मसीमधून विक्रीतून मागे घेण्यात आले आहेत. मंत्रालयाने पालकांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननंतरच फार्मसीमधून औषधे खरेदी करावीत असे सांगितले आहे. (हेही वाचा: Covid-19 in China: चीनने पुन्हा लपवली कोरोना संदर्भातील माहिती; दररोज 5 हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू, रिपोर्टमध्ये करण्यात आला दावा)

याआधी भारतामधील एका कफ सिरपमुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) कळवले आहे की, गांबियाने माहिती दिली आहे की, भारतामधील कफ सिरप आणि मुलांच्या मृत्यूबाबत अद्याप कोणताही थेट संबंध स्थापित झालेला नाही आणि ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यांनी या कफ सिरपचे सेवन केले नाही.