Covid-19 in China: चीन (China) मध्ये कोरोनाचा संसर्ग अनियंत्रित झाला आहे. रुग्णालये बाधित रुग्णांनी भरलेली आहेत आणि दिवसेंदिवस नवीन रुग्ण वाढत आहेत. एका आकडेवारीनुसार, सध्या चीनमध्ये 54 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हापासून चीनने आपले शून्य कोविड धोरण मागे घेतले आहे, तेव्हापासून रुग्णालयात दाखल झालेल्या नवीन रुग्णांचा कोणताही डेटा त्यांच्याकडून पाठवण्यात आलेला नाही.
चीनच्या या निर्णयामुळे आरोग्य तज्ज्ञांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. तज्ज्ञांना भीती आहे की, चीन पुन्हा कोरोना संसर्गाची माहिती लपवत आहे. कोरोनामुळे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. कोविडमुळे हजारो लोक मरत आहेत, पण चीन जगासमोर खोटे बोलत आहे. दरम्यान, चीनमध्ये कोविड-19 मुळे दररोज 5,000 हून अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. हेल्थ डेटा फर्म एअरफिनिटीचा अंदाज आहे की, चीनमध्ये दररोज मृतांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे. तथापि, चीन अधिकृत आकडेवारी टाळत असून जगाला सत्य सांगत नाही. (हेही वाचा - Covid-19 BF.7 Variant: कोरोनाच्या नव्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर IMA ने जारी केली अॅडव्हायजरी; देशवासियांना दिला 'हा' सल्ला)
WHO च्या साप्ताहिक अहवालात 7 डिसेंबरपर्यंत चीनमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या दर्शविली आहे. 4 डिसेंबरपर्यंत, ही प्रकरणे 28,859 होती, जी गेल्या तीन वर्षांतील चीनमध्ये सर्वाधिक आहे. तथापि, 7 डिसेंबर रोजी चीनने झिरो कोविड धोरणातून माघार घेतली. तेव्हापासून चीनकडून WHO ला कोणताही डेटा पाठवण्यात आलेला नाही.
चीनमधील बीजिंग, ग्वांगझू, शेन्झेन आणि शांघाय या शहरांमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये महामारीचा वाढता दबाव पाहता, लोकांना सांगितले जात आहे की, हा मौसमी फ्लूसारखा आहे आणि नवीन ओमिक्रॉन फॉर्म फार धोकादायक नाही. ओमिक्रॉन विषाणू सामान्य सर्दीपेक्षा अधिक नाही. त्यामुळे घाबरू नका. सध्या चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहता रुग्णालयांमधील खाटा कमी पडू लागल्या आहेत. तसेच शवगृहांची परिस्थिती बिकट आहे.