Nancy Pelosi Taiwan Visit: 'अमेरिकेला भोगावे लागतील परिणाम', नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून चीनचा कडक इशारा (Watch Video)
Nancy Pelosi. (Photo Credits: IANS)

यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या सध्या आशिया दौऱ्यावर आहेत. पेलोसी यांचा सिंगापूर, मलेशिया, जपान आणि दक्षिण कोरियाला भेट देण्याचा कार्यक्रम आहे. अशात आता नॅन्सी पेलोसी यांचे तैवानमध्ये आगमन झाले आहे. पेलोसी तैवानलाही भेट देऊ शकतात अशा बातम्याही आधी आल्या होत्या. नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यास त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील, असा इशारा चीन सातत्याने अमेरिकेला देत आहे. आताही बीजिंग आणि वॉशिंग्टन यांच्यातील तणाव वाढत असताना, यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यास अमेरिका त्याची ‘मोठी किंमत’ मोजेल, असे चीनने सांगितले आहे. अशाप्रकारे तैवानच्या मुद्द्यावरून जगातील दोन महासत्ता अमेरिका आणि चीन पुन्हा आमनेसामने आल्या आहेत.

गेल्या 24 वर्षांत अमेरिकेच्या कोणत्याही निवडून आलेल्या उच्च प्रतिनिधीने तैवानला भेट दिली नाही. चीन तैवानला आपला भाग मानतो आणि अमेरिकेच्या नेत्याच्या तैवान भेटीला चीनच्या सार्वभौमत्वावरील हल्ला म्हणून पाहत आहे. चीन तैवानवर आपला हक्क सांगत आहे आणि नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे तिथल्या चिनी प्रभावावर परिणाम होऊ शकतो, असे चीनला वाटते. नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीमुळे अमेरिका तैवानमध्ये फुटीरतावादी अजेंड्यावर काम करत असल्याचा चीनचा विश्वास आहे.

इंडो-पॅसिफिकच्या दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ काल सकाळी सिंगापूरला पोहोचले. आता माहिती मिळत आहे की, तैवान दौऱ्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी मलेशियाहून तैवानला रवाना झाल्या आहेत. नॅन्सी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8.20 वाजता त्या तैवानला पोहोचल्या. नॅन्सी पेलोसीचे स्वागत करण्यासाठी तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग-वेन विमानतळावर उपस्थित राहिल्या होत्या. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवानला भेट देण्याच्या योजनेशी संबंधित बातम्यांचे आपण बारकाईने निरीक्षण करत असल्याचे चीनने म्हटले आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकन अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी टेलिफोनिक संभाषणात तैवानच्या कारभारात हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला होता. मात्र अमेरिकन नेत्यांचे म्हणणे आहे की ते चीनच्या या दृष्टिकोनाचे समर्थन करत नाहीत. (हेही वाचा: Al-Qaida Leader Ayman al-Zawahiri killed: अल कायदा प्रमुख अल जवाहिरी याचा अमेरिकी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात खात्मा)

दरम्यान, नॅन्सी पेलोसी ज्या भागात भेट देणार आहेत त्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. चिनी सैन्य तैवानजवळ लष्करी कवायती करत आहे. हा वाढता तणाव पाहता या भागात प्रवासी विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. चीनने आपली लढाऊ विमाने तैवानजवळ तैनात केली आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अनेक युद्धनौकाही तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अमेरिकेनेही आपल्या युद्धनौका या बेटाजवळ तैनात केल्या आहेत. 1970 नंतर पहिल्यांदाच परिस्थिती इतकी गंभीर आहे आणि युद्धाचा धोका निर्माण झाला आहे, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.