Most Powerful Countries in The World: समोर आली जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी; USA पहिल्या क्रमांकावर, जाणून घ्या भारताचे स्थान

Most Powerful Countries in The World: वर्ष 2030 पर्यंत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी देश सातत्याने प्रयत्न करत आहे. मोठ्या परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक वाढवली आहे. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रातही देश रोज नवनवीन उदाहरणे प्रस्थापित करत आहे. सध्या भारतीय लष्कराकडे एकापेक्षा एक क्षेपणास्त्रे आणि शस्त्रे आहेत जी शत्रूला पराभूत करू शकतात. मात्र, जागतिक स्तरावर पाहिले तर, भारत जगातील पहिल्या 10 शक्तिशाली देशांमध्ये नाही. अमेरिकेतील एका प्रकाशनाच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. 'यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट'ने जाहीर केलेल्या जगातील शक्तिशाली देशांच्या यादीत भारताला 12वे स्थान मिळाले आहे.

अहवालात म्हटले आहे की, सध्या युनायटेड स्टेट्स, चीन, रशिया, जर्मनी, युनायटेड किंगडम, दक्षिण कोरिया, फ्रान्स, जपान, सौदी अरेबिया, युएई हे जगातील 10 सर्वात शक्तिशाली देश आहेत. या यादीत इस्रायल 11 व्या क्रमांकावर आहे, तर भारत 12 व्या क्रमांकावर आहे.

हे रँकिंग मॉडेल जागतिक मार्केटिंग कम्युनिकेशन कंपनी डब्ल्यूपीपी आणि यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्टच्या BAV ग्रुपने संयुक्तपणे तयार केले आहे. यामध्ये भारताला 100 पैकी 46.3 गुण देण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, सॉफ्टवेअर कामगार, व्यवसाय आउटसोर्सिंग सेवा आणि माहिती तंत्रज्ञान सेवांमध्ये भारतामध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु वारसा आणि सांस्कृतिक प्रभावासाठी त्याला जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत.

ही यादी देशाची शक्ती दर्शवणाऱ्या 5 वैशिष्ट्यांवर तयार करण्यात आली आहे, यामध्ये नेते, आर्थिक प्रभाव, राजकीय प्रभाव, मजबूत आंतरराष्ट्रीय युती आणि मजबूत सैन्य यांचा समावेश आहे.

ताजमहाल, हुमायून मकबरा, कोणार्कचे सूर्य मंदिर आणि इतर प्रमुख मंदिरे यासारख्या ऐतिहासिक स्थळांसाठी भारत ओळखला जातो, असे अहवालात म्हटले आहे. आधुनिक भारताने सांस्कृतिकदृष्ट्याही योगदान दिल्याचे अहवालात म्हटले आहे. भारताचा चित्रपट उद्योग जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात मोठा चित्रपट निर्मिती उद्योग आहे. 1980 पासून भारताने तीन बुकर पारितोषिक विजेते आहेत.

देशाची मोठी लोकसंख्या आणि कमी दरडोई उत्पन्न यामुळे भारताला पहिल्या 10 शक्तीशाली देशांमध्ये येण्यापासून रोखले जाते यावर रँकिंग मॉडेलने जोर दिला. अहवालात म्हटले आहे की, 'भारताची मोठी लोकसंख्या आणि कमी दरडोई उत्पन्नाचा सर्वांगीण क्रमवारीवर विपरीत परिणाम झाला आहे. देशाची वेगवान वाढणारी वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्था आहे, ज्यामध्ये मोठ्या, कुशल कामगारांची संख्या आहे, परंतु लोकसंख्या, दरडोई उत्पन्न आणि सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या बाबतीत, तो जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे.' (हेही वाचा: BYJU Layoffs 2024: आर्थिक संकटात सापडलेल्या बायजूसने १,५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ)

विश्लेषणातून असे दिसून आले की, भारत उपलब्ध संसाधनांपेक्षा कमी कामगिरी करत आहे. अमेरिका आणि चीननंतर भारत सर्वात मोठी शक्ती बनणार आहे, परंतु अमेरिकेच्या आघाडीच्या नेटवर्कमध्ये देशाचा समावेश नाही. शक्तिशाली देशांच्या यादीत जे देश आहेत त्यांचे पर्यटन क्षेत्रही सर्वात मजबूत आहे, येथे दरवर्षी लाखो-करोडो पर्यटक भेट देतात. त्यामानाने भारताच्या पर्यटन क्षेत्रात वाढीसाठी अजूनही बराच वाव आहे.