Lahore Smog | (Photo Credits X)

Pakistan Pollution And Toxic Air: भारतातच नव्हे तर शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये सुद्धा काही शहरांमध्ये वायूप्रदुषण हा चिंतेचा विषय ठरु पाहतो आहे. वृत्तसंस्था एएनआयने एआरवायन्यूजच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोर (Lahore Smog) शहरात पाठिमागील 24 तासात हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. इतकी की,केवळ 24 तासांत श्वसन आणि विषाणूजन्य संसर्गाची (Respiratory Infections) 15,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यामुळे लाहोर आणि पाकिस्तानच्या इतर भागातील धुराचे संकट चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. नागरिकांना कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, न्यूमोनिया आणि छातीतील संसर्ग यासारख्या लक्षणांमुळे लाहोरमधील रुग्णालये भरली आहेत. शहराला धुक्याने वेढले आहे.

रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी

लाहोरमध्ये सर्वाधिक रुग्ण सरकारी रुग्णालयांमधून नोंदवले गेले आहेत. मेयो इस्पितळात 4,000 हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले, जिन्ना इस्पितळात 3,500 रुग्ण, गंगाराम इस्पितळात 3,000 रुग्ण आणि चिल्ड्रन्स इस्पितळात 2,000 हून अधिक रुग्ण आढळले. वैद्यकीय तज्ञांनी असा इशारा दिला आहे की दमा आणि हृदयरोग यासारख्या आधीपासून असलेल्या परिस्थिती असलेली मुले आणि व्यक्ती विशेषतः धुराच्या हानिकारक प्रभावांना बळी पडू शकतात. (हेही वाचा, Air Pollution Hamper Children Learning: वायुप्रदूषणाचा मुलांच्या स्मरणशक्तीवर होऊ शकतो परिणाम; अमेरिकन विद्यापाठीच्या अभ्यासात समोर आली माहिती)

नागरिकांना श्वसन आणि त्वचाविकार

रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. अश्रफ झिया यांनी सांगित लेकी, "विशेष मुले हवा गुणवत्ता घसरलेल्या वातावरणात गंभीरपणे प्रभावित होतात. बिघडलेल्या धुकेमुळे लाहोरमध्ये न्यूमोनिया, त्वचेचे संक्रमण आणि श्वसनाशी निगडीत इतर आजारांसह विषाणूजन्य रोगांमध्येही वाढ झाली आहे. शहरात आगोदरच दहाहून अधिक विषाणूजन्य रोग सक्रिय आहेत. त्यातच आता ही भर पडल्याने वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढल्याचे डॉ. झिया म्हणाल्या. (हेही वाचा, Air Pollution in India: वाढते वायू प्रदूषण भारतासाठी आव्हान; देशातील 10 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता घसरल्याने दरवर्षी सुमारे 33,000 मृत्यू)

एक्यूआय धोकादायक राहिल्याने आपत्कालीन उपाययोजना

हवेची पातळी खालावल्याने पाकिस्तान प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. पंजाब सरकारने विवाहसमारंभांसह मोठ्या सार्वजनिक मेळाव्यांवर तीन महिन्यांची बंदी घातली आहे. प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने नवीन वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याव्यतिरिक्त, संसर्ग कमी करण्यासाठी पंजाबभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत, तर सरकारने रहिवाशांना शक्य असेल तिथे घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

नासाच्या मॉडरेट रिझोल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडिओमीटर (एमओडीआयएस) उपग्रहाने धुराच्या प्रभावाची विस्तृत छायाचित्रे घेतली. ज्यात उत्तर पाकिस्तानला वेढलेल्या दाट धुक्याचे वर्णन केले आहे. नासा मोडिसने दिलेल्या वृत्तानुसार, "नोव्हेंबर 2024 च्या सुरुवातीला उत्तर पाकिस्तानात दाट धुके पसरले होते, ज्यामुळे शाळा बंद करणे आणि रुग्णालयात दाखल करणे भाग पडले". पंजाब प्रदेशातील काही भागांतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 10 नोव्हेंबर रोजी 1,900 हून अधिक झाला, ज्यामुळे हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत गेली. त्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने धुराचे 'आपत्ती' म्हणून वर्गीकरण केले असून, हवेच्या गुणवत्तेवर उपाय म्हणून कठोर कारवाई केली आहे. 12 नोव्हेंबर रोजी, सरकारी आकडेवारीने सूचित केले की संपूर्ण पंजाबमध्ये एक्यूआय सरासरी 604 आहे, जो "धोकादायक" श्रेणीत आहे.

नासा मोडिसने पुढे म्हटले की प्रदूषण इतके तीव्र आहे की "टॅन धुके पाकिस्तानच्या भूप्रदेशाला पूर्णपणे झाकोळून टाकत आहे. धुक्याने जमीन देखील व्यापली आहे. जागतिक स्तरावर सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले जाणारे लाहोर हे अजूनही संकटाच्या केंद्रस्थानी आहे.