
H5N1 स्ट्रेनमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य बर्ड फ्लू साथीच्या आजाराच्या वाढत्या धोक्याबद्दल आरोग्य तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य तज्ञांनी व्यक्ती केलेल्या भीतमध्ये म्हटले आहे की, हा साथीचा आजार COVID-19 व्हायरसपेक्षाही अधिक धोकादायक असू शकतो. तज्ज्ञांनी याची तीव्रता वर्तवताना म्हटले आहे की, ही महामारी कोरोनापेक्षा 100 पटींनी हानिकारक असू शकते आणि संक्रमित झालेल्यांपैकी निम्म्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हा विषाणू आता एका अत्यूच्च पातळीवर आहे. ज्यामुळे जागतिक आरोग्य संकट उद्भवू शकते.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार,बर्ड फ्लूचा H5N1 स्ट्रेन जागतिक महामारी उद्भवण्याच्या अत्युच्च टोकावर आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा जगासमोर नागरिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. H5N1, एव्हीयन इन्फ्लूएंझा A चा स्ट्रेन पोल्ट्रीमध्ये निर्माण होतो, असा अभ्यास सांगतो. एका अभ्यासानुसार हा व्हायरस 1996 मध्ये चीनमध्ये पहिल्यांदा आढळून आला. हळूहळू तो जगभरात पसरला. या व्हायरसचे संक्रमण प्रामुख्याने पक्ष्यांकडून मानवामध्ये होते. खास करुन कोंबड्या आणि पाळीव पक्षी. प्राथमिक परिणाम पक्ष्यांवर होत असला तरी तो सस्तन प्राण्यांना संक्रमित करू शकतो. ज्याचे परिणाम घातक ते सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या प्रकरणांपर्यंत असतात. (हेही वाचा, Bird Flu Pandemic: कोरोनापेक्षा 100 पट वाईट असू शकते बर्ड फ्लू महामारी; तज्ञांनी व्यक्त केली चिंता)
मिशिगनमधील पोल्ट्री सुविधा आणि टेक्सासमधील अंडी उत्पादक प्रदेशात एव्हीयन फ्लूचा उद्रेक नोंदवला गेला आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने टेक्सासमधील डेअरी फार्म कामगारामध्ये H5N1 संसर्गाची पुष्टी केली आहे. एक प्रख्यात बर्ड फ्लू संशोधक डॉ. सुरेश कुचीपुडी यांनी मानवांसह विविध सस्तन प्राण्यांना संक्रमित करण्याच्या विषाणूच्या क्षमतेमुळे उद्भवणाऱ्या महामारीच्या संभाव्य धोक्यावर भर दिला. फार्मास्युटिकल सल्लागार जॉन फुल्टन यांनीही या शक्यतेची पुष्टी केली आणि म्हटले की H5N1 चा उच्च मृत्यू दर राखणारे उत्परिवर्तन COVID-19 पेक्षा खूपच घातक असू शकते. दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2003 पासून H5N1 साठी 52% मृत्यू दर नोंदवला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, 887 प्रकरणांपैकी 462 मृत्यू आहेत.
दरम्यान, बर्ड फ्लू साथीचा सर्वाधिक फटका पोल्ट्री इंडस्ट्रीला बसतो. कोरोना महामारीमध्येही आलेल्या अनेक बातम्या, आणि व्हायरल झालेली माहिती यांमुळे पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे आगामी काळात संभाव्य धोक्याबाबत या उद्योगात आतापासूनच भीतीचे सावट आहे.