Maharashtra Kesari Kusti 2018: 'महाराष्ट्र केसरी' विजेत्याला बहाल करण्यात येणारी 'चांदीची गदा' नेमकी कशी असते?
महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख (Photo Credit: Twitter)

Maharashtra Kesari Kusti 2018:  बाला रफिक शेख  2018  च्या 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी ठरला आहे. आज जालना येथे झालेल्या अभिजित कटके (Abhijeet Katke) विरुद्धच्या सामन्यात 11-3 अशी मात देत बाला रफिक शेखने (Bala Rafiq) विजेतेपदाला गवसणी घातली. अभिजित कटके गतवर्षीचा विजेता होता. तर बाळा रफीक शेख याला पहिल्यांदाच 'महाराष्ट्र केसरी' होण्याचा मान मिळाला आहे. विजेत्या बाला रफीक शेखला चांदीची गदा देवून सन्मानित करण्यात आले. बाला रफिक शेख, महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018 विजेते, पहा 1961-2018 पर्यंत कोण कोण आहेत विजेते

तर ही चांदीची गदा नेमकी असते तरी कशी? काय आहे या गदेची खासियत? चला जाणून घेऊया....

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचं 1982 साली निधन झालं. त्यानंतर ही परंपरा मोहोळ कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द केली. गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.

महाराष्ट्र केसरी चांदीची गदा नेमकी कशी असते?

पेशव्यांच्या दागिने, बांधकामं आणि भांडी यावर पानगरी नावाचे गृहस्थ नक्षीकाम करत. त्याच पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी दरवर्षी 'महाराष्ट्र केसरी' विजेत्याला देण्यात येणारी गदा बनवतात.

गदेच्या आतील भागासाठी सागवानी लाकूड वापरले जाते. त्यावर कोरीव काम आणि आकर्षक पिळे असतात. तर बाह्य भागासाठी 32 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्र्या वापरऱ्या जातात. त्यावर कोरीव काम करण्यात येते. तर गदेच्या मध्यभागी मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवलेली असते. त्याच्या पलिकडच्या बाजूला हनुमानाचं चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसवलेलं असतं. गदेची उंची 27 ते 30 इंच असते तर व्यास 9 ते 10 इंच असतो. वजन 10 ते 12 किलो इतके असते.