
वर्ष 2019 मधील सर्व कसोटी आणि टी-20 सामने संपले आहेत, आता पुढच्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होईल. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी क्रिकेटचे बायबल मानले जाणारे विस्डेन (Wisden) मासिकाच्या वेबसाइटने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यासारखे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू नसलेल्या दशकातील सर्वोत्कृष्ट संघाची घोषणा केली आहे. विस्डेनच्या दशकातील सर्वोत्कृष्ट टी-20 संघात रोहितच्या जागी कोलिन मुनरो आणि अॅरोन फिंच (Aaron Finch) यांची सलामी फलंदाज म्हणून निवड झाली आहे. मनरो आणि फिंचचा स्ट्राइक रेट 150 च्या वर आहे. विस्डेनचा हा निर्णय खूपच धक्कादायक आहे कारण रोहित हा सध्याचा सर्वोत्कृष्ट टी-20 फलंदाज आहे. रोहितने टी -20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक 4 शतकं केली आहेत. विशेष म्हणजे विस्डेनच्या टी-20 संघात विराट कोहली (Virat Kohli) याचा समावेश असूनही संघाचे नेतृत्व फिंच करणार आहे. यापूर्वी, जाहीर झालेल्या विस्डेनच्या कसोटी आणि वनडे संघातही कोहलीला स्थान मिळाले आहे. विस्डेनच्या या यादीत टीम इंडियाच्या फक्त दोन क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. (Wisden ने केली दशकाच्या टॉप-5 क्रिकेटपटूंची घोषणा, टीम इंडियाच्या 'या' एका खेळाडूचा समावेश)
विस्डेनच्या दशकातील सर्वोत्तम टी-20 संघात इंग्लंडच्या जोस बटलर याला धोनीच्या जागी विकेटकीपर म्हणून निवडले गेले आहे. शेन वॉटसन आणि ग्लेन मॅक्सवेल यांची अष्टपैलू म्हणून निवड झाली आहे. मोहम्मद नबी देखील अष्टपैलू म्हणून सामिल आहे. विस्डेनने डेव्हिड विले आणि राशिद खान यांनाही संघात समाविष्ट केले आहे. या संघात वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा यांचा समावेश झाला आहे.
विस्डेनचा दशकातील टी-20 संघः आरोन फिंच (कॅप्टन), कोलिन मुनरो, विराट कोहली, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, जोस बटलर, मोहम्मद नबी, डेव्हिड विले, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.