Kolkata Traffic Police | (Photo Credit : Twitter)

कोलकाता पोलीस (Kolkata Police) या ट्विटर हँडलवरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. हा फोटो आहेच लक्ष वेधून घेण्यासारखा. होय, पाऊस आला की सर्वांचीच तारांबळ उडते. त्यातही पावसाचे प्रमाण अधिक असेल तर काहीशी अधिकच. आपण मानव लगेचच आडोशाला जातो किंवा एखाद्या इमारतीचा आश्रय घेतो. पण मुक्या प्राण्यांचे काय? माणसांप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही मदतीची आणि आश्रयाची आवश्यकता असते. कोलकाता वाहतूक पोलिसांनी (Kolkata Traffic Police) ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या फोटोमध्ये हेच दिसते. पाऊस आल्याने वाहतूक कोंडी होते. या वेळी सर्व लोक पावसामुळे आश्रय शोधत असताना दोन श्वान म्हणजेच दोन कुत्रे (Dogs) हे वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याच्या छत्रीखाली आश्रय घेताना दिसत आहेत. वाहतूक पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यात व्यग्र होते. तर हे कुत्रे शांतपणे पोलिसाच्या छत्रीखाली उभे राहून रस्त्यावरुन ये जा करणाऱ्यांवर लक्ष पाहात आहे. हा फोटो कोलकाता शहरातील एका चौकातील आहे.

कोलकाता पोलिसांच्या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, या फोटोत दिसणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव तरुण कुमार मंडल असे आहे. या फोटोला 'आजचा क्षण' अशी कॅप्शन देण्यात आली आहे. फोटोत दिसते की, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या एका हातात छत्री पकडली आहे. तर दुसऱ्या हाताने वाहतूक नियंत्रण करत आहे. तर छत्रीखाली विसावलेले दोन कुत्रे चौकातील क्रॉसिंग केंद्रावरुन सर्वांवर बारीक लक्ष ठेवत आहेत.

नेहमीच सांगितले जाते की, पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा मानसाचा सर्वात विश्वासू प्राणी आहे. जो मानवाचा सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करतो. तो मानवाचा सर्वात चांगला दोस्त असल्याचेही आपण अनेक चित्रपटांमध्येही पाहिले असेल. काही लोक असेही म्हणतात की कुत्रा हा देखील मानवाप्रमाणे सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे अनेकदा कुत्रे हे मानवासोबत समुहानेच राहणे पसंत करतात.

ट्विट

कोलकाता पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो आतापर्यंत 26 हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केला आहे. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वांनीच या फोटोचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.