MHADA Book My Home | (Photo credit: archived, edited, representative image)

MHADA Lottery: म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ५३५४ सदनिका आणि ७७ भूखंडांसाठीची बहुप्रतिक्षित संगणकीय सोडत शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ही सोडत काढण्यात येईल. ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर), ओरोस (जि. सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील विविध गृहनिर्माण योजनांमधील सदनिका व भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीसाठी एकूण १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून, अनामत रकमेसह १,५८,४२४ अर्ज सोडत प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

सोडतीचे थेट प्रक्षेपण आणि निकाल

अर्जदारांना सोडतीचा निकाल त्वरित मिळावा यासाठी कोकण मंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. अर्जदारांना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण खालील लिंकवर वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या पाहता येईल

निकाल

सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजेनंतर प्रसिद्ध केली जाईल. विजेत्या अर्जदारांना त्यांनी नोंद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे तात्काळ संदेशही प्राप्त होणार आहे. कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी ही माहिती दिली.

सदनिका आणि भूखंडांचे गट

कोकण मंडळाची ही सोडत IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) या संगणकीय प्रणालीद्वारे होत आहे. ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे:

योजनेचा घटक सदनिका/भूखंड संख्या
२०% सर्वसमावेशक योजना ५६५ सदनिका
१५% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना ३००२ सदनिका
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (विखुरलेल्या सदनिका) १७४६ सदनिका
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (५०% परवडणाऱ्या सदनिका) ४१ सदनिका
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना ७७ भूखंड