Hero Rat Wins A Top Animal Award: आतापर्यंत तुम्ही विविध क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिल्याचं ऐकलं असेल. मात्र, ब्रिटनमध्ये चक्क एका उंदराला 'शौर्य' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उंदराला शौर्य पदकाने सन्मानित करण्यामागे नेमके काय कारण असेल? या उंदराने आतापर्यंत हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत. या उंदराने आपल्या वास घेण्याच्या क्षमतेमुळे कंबोडियामध्ये 39 भूसुरुंग शोधून काढले. तसेच 28 जिवंत स्फोटकांचादेखील या उंदराने शोध लावला आहे. मागावा (Magawa) असं या उंदाराचं नाव असून ते आफ्रिकन प्रजातीचे आहे. या उंदराने आतापर्यंत हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत. दरम्यान, ब्रिटनमधील चॅरिटी संस्था पीडीएसएने (PDSA) मागावा उंदराच्या कामगिरीची दखल घेत त्याला सुवर्ण पदकाने सन्मानित केलं. पीडीएसए ही संस्था पूर्वी आजारी जनावरांसाठी दवाखाना म्हणून ओळखली जात होती. मागावाला बेल्जियमच्या संस्थेने प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात ही संस्था गेल्या 20 वर्षांपासून उंदरांना जमिनीखालील भूसुरुंग शोधून काढण्याचं प्रशिक्षण देत आहे. (हेही वाचा - Hungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ)
मागावाला प्रशिक्षण देणारी एपीओपीओ संस्था बेल्जियममध्ये आफ्रिका खंडातील टांझानियामध्ये काम करते. या संस्थेने 1990 पासून मागावासारख्या अनेक उंदरांना प्रशिक्षण दिलं आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी एका उंदराला एका वर्षाचा कालावधी लागतो. त्यानंतर या उंदरांना 'हिरो रॅट' अशी पदवी दिली जाते. (Viral Video: नदीच्या प्रवाहात वा-याच्या वेगासारखा धावणारा Moose प्राणी पाहून नेटिझन्स झाले हैराण; पाहा अचंबित करणारा व्हिडिओ)
दरम्यान, भूसुरुंगामुळे हजारो लोकांचे प्राण जातात. याशिवाय भूसुरूंगाचा शोध मानवाने घेतल्यास त्याच्या वजनाने त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अत्यंत कमी वजनच्या उंदराच्या साहाय्याने स्फोटकांचा शोध घेणं अत्यंत सोयीचं आणि सोप आहे. मागावा उंदराचं वजन अत्यंत कमी म्हणजेच 1.2 किलो आहे. त्यामुळे त्याच्या वजनाने भूसुरुंगाचा स्फोट होत नाही. हा उंदिर आपल्या वास घेण्याच्या क्षमतेवरून जमीनीतील स्फोटकं आणि भूसुंरुग ओळखतो.
मागवा हा आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आलेल्या उंदराच्या गटातील सर्वात यशस्वी उंदीर आहे. ज्याने हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. एपीओपीओचे मुख्य कार्यकारी ख्रिस्तोफ कॉक्स यांनी सांगितले की, मागावाला मिळालेलं सुवर्ण पदक आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. कंबोडिया तसेच जगातील सर्व लोक भूसुंरूगामुळे पीडित आहेत. कंबोडियात 1979 पासून आतापर्यंत भुसुरुंगामुळे तब्बल 64 हजारहून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय 25 हजार पेक्षा जास्त जणांना या स्फोटात अपंगत्व आलं आहे.