मुंबई: येस बँक घोटाळ्यातील आरोपी कपिल वाधवान, धीरज वाधवान यांची CBI Custody येत्या 10 मे पर्यंत कायम
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

येस बॅंक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेल्या वाधवान कुटुंबियांपैकी कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांना सीबीआयने (CBI) ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांच्या सीबीआय कोठडीत वाढ केली असून येत्या 10 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय सुनावला आहे. वाधवान कुटुंबियांनी लॉकडाउनच्या काळात मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती आणि राजकीय वातावरण सुद्धा तापले होते. मात्र वाधवान कुटुंबियांचा क्वारंटाइन संपल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

येस बँक घोटाळ्यातील आरोपी कपिल आणि धीरज यांना यापूर्वी 8 मे पर्यंत सीबीआयची कोठडी कायम राहणार असल्याचा निर्णय विशेष कोर्टाने सुनावला होता. परंतु त्यात आता वाढ करण्यात आली असून 10 मे पर्यंत कायम राहणार आहे. वाधवान कुटुंबियांना 28 एप्रिलला अटक करण्यात आली होती. येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना लाच देणे आणि घोटाळ्यासंबंधित काही रिपोर्ट दाखल केल्याच्या 50 दिवसानंतर ते सीबीआयच्या तावडीत सापडले होते. वाधवान बंधूंचा शुक्रवारी रिमांड कालावधी संपल्यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. या वेळी सीबीआयने वाधवान आणि कपूर यांच्या कारस्थानासंबंधित तपासासाठी त्यांच्या अटकेची मुदत वाढवण्याची मागणी केली.(लॉक डाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबामधील 23 सदस्य महाबळेश्वरला; गृहमंत्रालयाच्या सचिवांनी दिले परवानगीचे पत्र)

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने असे म्हटले आहे की, वाधवान बंधू 150 हून अधिक मुखवटा घातलेल्या कंपन्या चालवत असून त्याप्रकरणी अद्याप तपास करणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत राणा कपूर आणि त्यांचा परिवार सुद्धा काही कंपन्यांचे संचलन करतात. त्यामुळे वाधवान आणि कपूर यांच्याकडून संचलन करण्यात येणाऱ्या कंपन्यांचा परस्पर संबंध आहे की नाही हे तपासून पाहणे महत्वाचे आहे. सीबीआयने वाधवान कुटुंबावर असा आरोप लावला होता की, वाधवान बंधुंनी त्यांची कंपनी दीवान हाउसिंग फायनान्स कॉरपोरेशनला फायदा होण्यासाठी राणा कपूर यांच्यासोबत कट रचला होता. या घोटाळ्याची सुरुवात एप्रिल ते जून 2018 दरम्यान झाली आहे. जेव्हा येस बँकेमे डीएचएफलच्या शॉर्ट टर्म डिबेंचर्समध्ये 3700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.