लॉक डाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबामधील 23 सदस्य महाबळेश्वरला; गृहमंत्रालयाच्या सचिवांनी दिले परवानगीचे पत्र
Mumbai Police| (Photo Credits: Mumbai Police Twitter)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) सर्वाधिक कहर महाराष्ट्रात आहे. राज्यात कोरोना संक्रमणाची संख्या 1364 झाली आहे. आज राज्यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात चालू असलेले लॉक डाऊन (Lockdown) अजून कडक करण्याबाबत पावले उचलली जात आहेत. मात्र डीएचएफएल (DHFL) गटाचे सदस्य लॉक डाऊनचे उल्लंघन करून महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेले असल्याची महित्ती समोर येत आहे. येस बँक घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या वाधवान कुटुंबातील (Wadhawan Family) 23 जण कोरोना लॉक डाऊन दरम्यान मुंबईहून महाबळेश्वरला गेले व यासाठी त्यांना विशेष परवानगी देण्यात आली होती. आता ही बाब उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वाधवान कुटुंब जेव्हा महाबळेश्वरला पोहोचले तेव्हा तेथील स्थानिक लोकांनी त्यांच्या येण्याचा निषेध केला. यानंतर त्यांना तिथेच वेगळे ठेवण्यात आले आहे. ही बाब समोर आल्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत, लॉक डाऊनमध्ये यांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी मिळालीच कशी याची चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीने वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या पत्रामध्ये कुटुंबाचा उल्लेख 'Family Friend' असा केला आहे.

याबाबतचे एक पत्र मिळाले असून या पत्रावर सर्व वाहनांचे क्रमांक आणि सदस्याची माहिती आहे. एकूण 5 वाहनांमधून हे 23 सदस्य महाबळेश्वरला गेले. या पत्रामुळे त्यांना रस्त्यामध्ये कोणी अडवले नाही. सध्या या कुटुंबाला पाचगणीच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली आहे.

या प्रकरणामुळे विरोधी पक्षनेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून याबाबतचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचाकडे मागितले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणतात, ‘हे कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने घडले आहे, याबाबत श्री. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आम्हाला स्पष्टीकरण हवे आहे. महाराष्ट्रात बलाढ्य आणि श्रीमंत लोकांसाठी लॉक डाऊन नाही? एक कुटुंब पोलिसांच्या परवानगीने महाबळेश्वरमध्ये आरामात सुट्टी घालवत आहे. हे कसे शक्य आहे? होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव असूनही एखाद्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडून हे घडेल असे शक्य नाही’. अशाप्रकारे फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधलां आहे.

याबाबत किरीट सोमय्या यांनीही सरकारवर टीका केली आहे, ‘ते म्हणतात लॉक डाऊनच्या काळात महाराष्ट्र सरकार श्रीमंतांना VVIP ट्रिटमेंट देत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती मी राज्यपालांकडे केली आहे.’ (हेही वाचा: Coronavirus: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणू च्या 229 नवीन रुग्णांची नोंद; राज्यातील संक्रमितांची एकूण संख्या 1364 वर)

दरम्यान, येस बँक प्रकरणात डीएचएफएलच्या सहभागाची चौकशी ईडी आणि सीबीआय करत आहेत. यात 3700 कोटींच्या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. येस बँकेकडून कर्ज घेण्यासाठी डीएचएफएलने बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना लाच म्हणून 600 कोटी रुपये दिल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे.