Lockdown In India: राज्यात अंडी, कोंबडी, मटण, फळ विक्रीवर कोणतेही बंधन नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

Lockdown In India: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन (Lockdown) असल्याने नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळणंदेखील कठीण झालं आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नसल्याचे म्हटलं आहे. नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येणार असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

याशिवाय कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. परंतु, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे. नागरिकांनी गर्दी न करता कोरोनाचा संसर्ग टाळायचा आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी पंढरपूरमधील 'चैत्रीवारी सोहळा' रद्द)

दरम्यान, जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थांची घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांनी व पोहोचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

याशिवाय नागरिकांना जीवनावश्यक पदार्थ खरेदी करता येतील. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र, ऊसतोड मजुरांच्या जेवणाची काळजी संबंधित कारखान्यांच्या व्यवस्थापनांना घ्यावी लागणार आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.