झारखंड राज्यात बर्ड फ्लू (Bird Flu Outbreak In Jharkhand ) आजारांचा धोका वाढला आहे. काही सरकारी पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू (Bird Flu) संसर्गाचा धोका वाढल्याचे लक्षात आल्यानंतर सुमारे 4,000 कोंबड्या (Chickens) आणि बदके (Ducks) मारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. झारखंड राज्यातील बोकारो जिल्ह्यात शनिवारी (25 फेब्रुवारी) सायंकाळी कोंबडी आणि बदके मारण्याची प्रक्रिया सुरू झाली, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमंना दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बोकारो जिल्ह्यातील लोहांचलमधील फार्ममध्ये 'कडकनाथ' या प्रथिनयुक्त जातीच्या चिकनमध्ये H5N1 विषाणूची पुष्टी झाली. एव्हीयन हा एक इन्फ्लूएंझा (Influenza Virus) विषाणूचा प्रकार आहे. या ठिकाणी 800 पक्षी मरण पावले आणि 103 पक्षी मारले गेल्याचेही अधिकार्याने सांगितले.
इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल हेल्थ अँड प्रोडक्शन, रांचीचे संचालक डॉ बिपिन बिहारी महथा यांनी पीटीआयला सांगितले की, बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव जाणवलेल्या भागात - फार्मच्या 1 किमी परिघात कोंबडी आणि बदकांसह एकूण 3,856 पक्षी मारण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरा सुरू झाली. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने रविवारीही पक्षीवध सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, 2 फेब्रुवारी रोजी शेतात पक्षी मरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या पक्षांचे नमुने भोपाळमधील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आणि फ्लूची पुष्टी झाली. (हेही वाचा, Bird Flu: अर्जेंटिना आणि उरुग्वेमध्ये आढळले बर्ड फ्लूचे रुग्ण)
दरम्यान, डॉ बिपिन बिहारी महथा यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ज्या लोकांची कोंबडी आणि बदके मारली जात आहेत त्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने याआधीच शेताच्या 1 किमी परिघातील क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. 10 किमी परिघाच्या आतील भागांना निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच जिल्ह्यात कोंबडी व बदकांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
बर्ड फ्लू म्हणजे काय?
बर्ड फ्लू म्हणजे ज्याला एव्हीयन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात. हा एक प्रकारचा विषाणू आहे. जो पक्ष्यांना प्रभावित करतो आणि काहीवेळा तो मानवांमध्ये पसरू शकतो. बर्ड फ्लूचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे H5N1 स्ट्रेन, जो एक संसर्गजन्य रोग आहे ज्यामुळे गंभीर श्वसन समस्या आणि मानवांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. H5N1 हा एव्हीयन इन्फ्लूएंझा (बर्ड फ्लू) चा संसर्गजन्य आणि संभाव्य घातक प्रकार आहे जो H5N1 म्हणून ओळखल्या जाणार्या विषाणूमुळे होतो. हा एक अत्यंत रोगजनक विषाणू आहे जो मानवांमध्ये तसेच कुक्कुटपालन आणि इतर पक्ष्यांमध्ये गंभीर आजार आणि मृत्यू होऊ शकतो.