Coronavirus: कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी पंढरपूरमधील 'चैत्रीवारी सोहळा' रद्द
Pandharpur Vitthal Mandir (Photo Credits: Facebook)

Coronavirus: सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने दहशत माजवली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे भरणारा चैत्रीवारी सोहळा (Chaitariwari Ceremony) रद्द करण्यात आला आहे. येत्या 4 एप्रिलला पंढरपूरमध्ये चैत्रीवारीचा सोहळा होणार होता. परंतु, कोरोना व्हायरसमुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप देवव्रत महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केलं होतं. त्यामुळे सरकारकडून येत्या 21 दिवसांत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण घेण्यात आला आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak: शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट कडून महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी ला 51 कोटीची मदत जाहीर)

दरम्यान, कोणत्याही वारकऱ्यांनी पंढरपूरला येण्याचा प्रयत्न करू नये, अशा सुचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्षी चैत्रीवारीला पंढरपूरमध्ये प्रचंड गर्दी होत असते. चैत्रवारी ही पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चार प्रमुख वाऱ्यांपैकी एक आहे. परंतु, यावर्षी पहिल्यांदा हा वारी सोहळा रद्द करण्यात येणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे राज्यातील मंदिरं बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, वारकरी मंडळीने चैत्री वारीला येवू नये, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य पंढरपूरमधील हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी केलं आहे.