Pune Cyber Fraud Cases: पुण्यात (Pune) सायबर फसवणुकीच्या (Cyber Fraud) प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान सायबर फसवणुकीची तब्बल 850 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे 198.45 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सायबर चोरांनी टास्क फ्रॉड, फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट फ्रॉड, मॅट्रिमोनी फ्रॉड, सेक्सटोर्शन, कर्ज ॲप्स, क्रेडिट कार्ड्स आणि क्रिप्टोकरन्सीजद्वारे ऑनलाइन फसवणूक यासारख्या विविध योजनांचा फायदा घेऊन ही फसवणूक केली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका आयटी अभियंते आणि सेवानिवृत्त व्यावसायिकांना बसला आहे.
हे फसवणूक लोक करणारे अनेकदा इंटरपोल, इंटेलिजन्स ब्युरो (IB), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), गुन्हे शाखा आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सारख्या प्रतिष्ठित एजन्सीची नावे वापरून फसवणूक करतात. (हेही वाचा: Cyber Crime: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! सायबर घोटाळेबाजांकडून वसूल केली 100 कोटी रुपयांची फसवणूक केलेली रक्कम; 35,918 तक्रारींचे केले निवारण)
अलीकडच्या एका प्रकरणात, सायबर गुन्हेगारांनी सिंहगड रोड येथील 74 वर्षीय रहिवाशाची दिल्लीतील पोलीस अधिकारी असल्याचे भासवत फसवणूक केली होती. याबाबत 5 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना, सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे म्हणाले, ‘फसवणूक करणारे भविष्य निर्वाह निधी, आर्मी, एसबीआय, मुंबई पोलीस आणि नार्कोटिक्स विभाग यांसारख्या संस्थांच्या नावांचा वापर करून लोकांना फसवतात. यासह अनेकदा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपद्वारे लोकांना संपर्क साधून, शेअर बाजारातील उच्च परतावा किंवा वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक करतात.’
शिंदे पुढे म्हणाले, ‘या घोटाळ्यांमुळे पीडितांच्या आर्थिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो. तसेच फसव्या जाहिरातींमुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक आरोपी राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार यांसारख्या प्रदेशांतून आलेले आहेत, भरतपूर, अलवर, नूह, गुरुग्राम, मथुरा आणि जामतारा हे जिल्हे सायबर फसवणुकीचे हॉटस्पॉट बनले आहेत.’