Cyber Crime (फोटो सौजन्य - Pixabay)

Cyber Crime: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सायबर फसवणूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी सायबर फसवणूक (Cyber ​​Fraud) करणाऱ्यांकडून (Cyber Fraudsters) सुमारे 100 कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे गेल्या सात महिन्यांत फसवणूक झालेल्या लोकांचे आहेत, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झाल्यामुळे सुमारे 35,918 पीडितांनी सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 द्वारे मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.

मुंबई पोलिसांकडून 35,918 तक्रारींचे निवारण -

पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) दत्ता नलावडे यांनी सांगितले की, सायबर फसवणुकीच्या सर्व 35,918 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. यात शेअर ट्रेडिंग, कुरिअर कॉल, गुंतवणूक योजना, डिजिटल अटकेच्या धमक्या आणि ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित तक्रारी होत्या. कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक झाल्यास, ताबडतोब 1930 वर कॉल करा. (हेही वाचा - Cyber-Crime And Financial Frauds: सायबर गुन्हे-आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी DoT चा मोठा निर्णय; 28,200 मोबाइल हँडसेट होणार ब्लॉक, 20 लाख क्रमांकांची पुनःपडताळणी)

हेल्पलाइनवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर, तीन शिफ्टमध्ये काम करणारे तीन अधिकारी आणि 50 कॉन्स्टेबल हे व्यवहार थांबवण्यासाठी बँक आणि त्यांच्या नोडल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधतात, असे डीसीपी नलावडे यांनी सांगितले. (हेही वाचा - Cyber Crime: सायबर चोरांकडून नवी शक्कल; थकीत रक्कम देण्याच्या बहाण्याने होत आहे निवृत्तीवेतनधारकांची फसवणूक, सावध राहण्याचे आवाहन)

पुढील फसवणूक टाळण्यासाठी, आरोपींची खातीही गोठवली आहेत. हेल्पलाइन क्रमांक 1930 लोकांसाठी जीवनवाहिनी बनली आहे, असंही नलावडे यांनी सांगितलं. सायबर फसवणूक करणारे लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी आणि लोकांकडून पैसे उकळण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.