केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी राजस्थानमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2025 च्या पूर्वसंध्येला युवा प्रतिभावान खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
“खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा हे भारतातील उदयोन्मुख क्रीडा प्रतिभेचा एक सशक्त उत्सव आहे. हे व्यासपीठ समर्पण, शिस्त आणि उत्कृष्टतेच्या भावनेचे उदाहरण देणाऱ्या सर्वोत्तम युवा खेळाडूंना एकत्र आणते. भारत 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी तयारी करत असताना, या स्पर्धा जागतिक मंचासाठी चॅम्पियन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे डॉ. मनसुख मांडविया म्हणाले.
खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) द्वारे राजस्थान सरकार आणि राजस्थान राज्य क्रीडा परिषद (RSSC) यांच्या सहकार्याने जयपूर, उदयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, भरतपूर आणि बिकानेर या सात शहरांमध्ये केले जाईल.
राजस्थान पहिल्यांदाच खेलो इंडिया विदयापीठ क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणार आहे, जो युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे ज्यामध्ये भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ-स्तरीय खेळाडू सहभागी होतात.
ही स्पर्धा असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन्स यांच्या सहकार्याने देखील आयोजित केली जाते. राजस्थानमधील पूर्णिमा विद्यापीठ हे यजमान विद्यापीठ आहे.
या वर्षी कॅनोइंग, कायाकिंग, सायकलिंग आणि बीच व्हॉलीबॉल या नवीन क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे - जे भारतीय विद्यापीठ स्तरीय खेळाची वाढती विविधता आणि महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करतात.
राजस्थानमधील खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ऑलिंपिक स्पर्धकांसह अनेक अव्वल खेळाडू भाग घेत आहेत.
त्यापैकी प्रमुख खेळाडूंमध्ये दुहेरी ऑलिंपियन जलतरणपटू श्रीहरी नटराज आणि ऑलिंपियन भजन कौर, प्रणीत कौर, आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेती आणि विश्वविजेती कंपाउंड तिरंदाज अदिती गोपीचंद स्वामी सारखे आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहेत.
जैन विद्यापीठाचा नटराज सहा जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे आणि 2022 नंतरची ही त्याची दुसरी खेलो इंडिया विदयापीठ क्रीडा स्पर्धा असेल.