मुंबईमधील (Mumbai) पात्र नागरिकांना दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून मुंबई लोकल रेल्वे (Mumbai Local) प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यासाठी ऑनलाईन ऍपद्वारे तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. ऍप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरु होईल. तत्पूर्वी उद्या, दिनांक 11 ऑगस्ट 2021 पासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, जेणेकरुन सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होवू नये.
रेल्वे मासिक प्रवास पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी निरंतर सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन करुन ही रेल्वे पास देण्याची ही प्रक्रिया नेमकी कशी असेल, त्याबाबत बोलताना चहल यांनी पुढीलप्रमाणे मुद्देसूद माहिती दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 53 उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा देखील समावेश आहे. या सर्व स्थानकांवर मिळून तिकिट खिडकी नजीक 358 मदत कक्ष असतील.
मुंबई महानगरासह आजुबाजूची सर्व शहरे मिळून म्हणजे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) एकूण 109 लोकल रेल्वे स्थानकांवर ही ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.
सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी उद्या ११ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी व मासिक रेल्वे पास प्रक्रिया होणार सुरू. pic.twitter.com/nSGop69Jm1
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 10, 2021
ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी), त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्रं जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीजवळ आल्यानंतर, तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका (अथवा संबंधित महानगरपालिका/नगरपरिषद/स्थानिक स्वराज्य संस्था) यांच्याद्वारे स्थापन केलेले मदत कक्ष (हेल्प डेस्क) असतील. हे मदत कक्ष सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरु राहतील.
मदत कक्षावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी (किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी) हे संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट - दुसरा डोस) वैधता कोविन ऍपवर तपासतील. तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल. (हेही वाचा: Mantralaya Updates: मंत्रालयात दारुच्या बाटल्या आढळल्याने खळबळ, राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश)
सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. मात्र, सदर पास आधारीत प्रवासाची सुविधा ही दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासूनच वैध असेल.