Raj Thackeray Aurangabad Rally: राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा; महाराष्ट्रभर उत्सुकता
Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) येथे जाहीर सभा होत आहे. ही सभा प्रचंड चर्चेत असून त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक संघटनांनी या सभेला विरोध दर्शवला आहे तर महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे अवाहन राज्य सरकारने केले आहे. महाराष्ट्र दिनी औरंगाबद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत असलेल्या या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.

औरंगाबाद येथील सभेला पोहोचण्यासाठी राज ठाकरे हे परवा (29 एप्रिल) मुंबईहून निघाले. काल (30 एप्रिल) त्यांनी पुण्यातून औरंगाबादकडे कूच केले. तत्पूर्वी पुणे येथे शेकडो पुरोहितांनी गर्दी केली. यापैकी सुमारे 100 ते 150 पुरोहितांनी वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे राज ठाकरे यांना आशीर्वाद दिले. त्यांतर राज यांनी वढू गावात जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि पुष्पहारही अर्पण केला. (हेही वाचा, Shiv Sena: शिवसेना सक्रीय; 14 एप्रिलला बीकेसी, 8 जूनला औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा)

जिन्स पॅन्टआणि इनशर्ट केलेला शेतकरी ट्रॅक्टर चालवत असलेला महाराष्ट्र मला घडवायचा आहे इथून सुरु झालेला राज ठाकरे यांच्या मनसेचा प्रवास 'मशिदींवरील भोंगे उतरवा' इथपर्यंत येऊन थांबला आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क आणि त्यानंतर ठाणे येथील सभेत राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जोरदार वादळ निर्माण झाले. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा आज म्हणजेच एक मे रोजी पार पडत आहे. शिवाजी पार्क येथील सभेनंतर राज ठाकरे यांनी ठाणे येथे सभा घेतली. या सभेनंतर त्यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा आयोजित केली. राज यांच्या सभांच्या जोरदार चर्चा सुरु असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही जाहीर सभा होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभांबाबत शिवसेनेने जाहीर केले आहे. त्यानुसार मुंबई येथील बीकेसी येथे 14 मे तर 4 जून रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे. त्यामुळे या दोन्ही सभांतून मुख्यमंत्री काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.