Suicide | (Photo Credits: unsplash.com)

मुंबईमध्ये (Mumbai) अल्पवयीन मुलींच्या आत्महत्येच्या (Minor Girls' Suicides) संख्येत वाढ दिसून आली आहे. मुंबई पोलिसांकडून आरटीआय कायद्याद्वारे प्राप्त झालेल्या अलीकडील आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. किशोरवयीन मुलांमधील आत्महत्यांची संख्या मुलींपेक्षा जास्त आहे; मात्र, गेल्या चार वर्षांत हा प्रकार उलटला आहे. 2019 ते 2022 दरम्यान, 188 मुलांनी आत्महत्या केल्या. दुसरीकडे अल्पवयीन मुलींनी आपला जीव घेण्याच्या घटनांमध्ये 23% वाढ झाली. अशी एकूण 231 प्रकरणे समोर आली आहेत.

सर्वाधिक आत्महत्या दर असलेल्या पहिल्या पाच भारतीय शहरांमध्ये मुंबईचा पहिला क्रमांक लागतो. शहरात आत्महत्यांमध्ये 2019 मधील 1,229 मृत्यूंवरून 2022 मध्ये 1,499 पर्यंत म्हणजेच 22% वाढ झाली आहे. या चार वर्षांमध्ये, 1,260 महिलांनी स्वतःचा जीव घेतला. यामध्ये पुरुषांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त म्हणजेच 3,765 आहे. अशा आत्महत्येसाठी कौटुंबिक समस्या आणि आर्थिक समस्या ही प्रौढांमधील मुख्य कारणे म्हणून उद्धृत केली जातात.

अल्पवयीन मुलींच्या वाढत्या आत्महत्येला विविध घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये तणाव, नातेसंबंधांमध्ये ताण, कुटुंबांसोबतच्या असलेल्या जवळीकतेचा अभाव, पालकांचे कठोर निर्बंध हे संभाव्य ट्रिगर म्हणून उद्धृत केले जातात. विविध बाबतीत सामाजिक दबाव, बॉडी शेमिंग हे देखील काही प्रभावित करणारे घटक म्हणून ओळखले जातात. (हेही वाचा: Mahadev Betting App Case: मुंबई पोलिसांकडून Saurabh Chandrakar सह 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; 15,000 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप)

सांताक्रूझ येथील एलएस रहेजा कॉलेजमधील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सम्या शिंदे यांच्या मते, पाश्चात्य प्रभाव, सोशल मीडियाचे वेड आणि सामाजिक अपेक्षा हे घटक तरुण मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांमध्ये योगदान देतात. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, याआधी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला होता की, महाराष्ट्रात यावर्षी 31 जुलैपर्यंत एकूण 1,555 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक 637 (सुमारे 40 टक्के) एकट्या अमरावती विभागात नोंदल्या गेल्या आहेत.