Kolhapur Municipal Corporation | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Kolhapur Municipal Corporation Election 2020:  पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख महापालिका अशी ओळख असलेल्या कोल्हापूर महापालिका (Kolhapur Municipal Corporation) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दरम्यान, या वेळी प्रभाग रचनेत मोठे बदल होणार असल्याने अनेकांचे धाबे दणानले आहेत. सांगितले जात आहे की, महापालिका निवडणुकीत या वेळी 95% प्रभागांतील आरक्षण (Kolhapur Municipal Ward Reservation) बदलले जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने या आधी झालेल्या तीन निवडणुकांतील ( 2005, 2010 व 2015 ) आरक्षण विषयक माहिती मागविली आहे. तसेच, आरक्षण कशा पद्धतीने टाकायचे, याच्या मार्गदर्शक सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे एकाच प्रभागात मांड ठोकून बसलेल्या अनेक नेते, नगरसेवक आणि इच्छुकांचे धाबे दणानले आहेत. त्यामुळे निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होण्याआधीच अनेकांनी संपर्क वाढवत रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

आरक्षण कसे असेल यावरुन अनेकांची घालमेल सुरु झाली असली तरी, प्रत्यक्षात आरक्षण कसे पडले हे सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कोल्हापूर महापालिकेत विद्यमान स्थितीत अनुसूचित जातीसाठी असलेल्या प्रभागांची संख्या 11 इतकी आहे. त्यावर खुल्या प्रवर्गाचे किंवा ओबीसीचे आरक्षण पडेल अशी शक्यता आहे. तसे झाले तर अनुसूचित जातीसाठी 11 प्रभाग नव्याने तयार होतील. तसेच असेही समजते आहे की, या वेळी महापालिकेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये जे प्रभाग ज्या प्रवर्गासाठी आरक्षित होते ते आता तसेच आरक्षित राहणार नाहीत. तर, सोडतेवेळी त्या प्रभागांच्या चिठ्ठ्या बाजूला काढल्या जातील. त्यामुळे साधारण दोन-पाच प्रभाग वगळता 95% म्हणजे जवळपास सर्वच प्रभागांतील आरक्षण बदलले जाणार आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2020: राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकासआघाडी घटक पक्षांमध्ये रस्सीखेच)

कोल्हापूर महापालिका प्रभाग आरक्षण स्थिती

  • एकूण प्रभाग 81
  • पुरुष राखीवर प्रभाग- 40 (50 % आरक्षण)
  • महिला राखीव प्रभाग- 41
  • ओबीसी राखीव प्रभाग- 22
  • सर्वसाधारण (खुला वर्ग) - 24

    (* महिला (41) आणि पुरुष (40) प्रभागांमध्येच ओबीसी आणि खुल्या वर्गाचे आरक्षित प्रभाग समाविष्ठ आहेत. त्यानुसारच प्रभागांची संख्या 81 इतकी आहे.)

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेतील 81 प्रभाग आहेत. त्यापैकी महिला आरक्षण 50% असल्याने त्यातील 41 प्रभाग हे महिलांसाठी राखीव असतील तर उर्वरीत 40 प्रभाग हे पुरुषांसाठी खुले असतील. दरम्यान, एकूण 81 पैकी 48 प्रभाग हे सर्वसाधारण (खुला वर्ग) असून त्यातील 24 प्रभाग महिलांसाठी आरक्षित असतील. तर अनुसूचित जातीसाठी 11 प्रभाग, इतर मागासवर्गीयसाठी 22 प्रभाग आरक्षित राहतील. दरम्यान, त्यापैकी 11 प्रभाग याच प्रवर्गातील महिलांसाठी असणार आहेत. त्यामुळे प्रभागांतील एकूण आरक्षण बदलांचा फटका अनेक प्रस्थापितांना बसू शकतो. त्यामुळे अनेकांची घालमेल वाढली आहे.