महाराष्ट्र राज्यात सलग 5 वर्ष आपलं मुख्यमंत्री पद टिकवून ठेवण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 40 वर्षांनी करून दाखवली आहे. 2019 साली झालेल्या निवडणुकीनंतरही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे जाणार का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रालाचं नाही तर देशाला पडला आहे. पण देवेंद्र फडणवीस नक्की राजकारणात कसे आले आणि त्यांचा हा राजकीय प्रवास कसा होता याची थोडक्यात आढावा घेऊया.
राजकारणातील प्रवेश
देवेंद्र फडणवीस यांनी नव्वदच्या दशकात राजकारणात प्रवेश केला. त्यांना त्यांच्या बडीलानाकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस जनसंघाचे नेते होते. इतकंच नव्हे तर युतीच्या पहिल्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या शोभाताई फडणवीस या देवेंद्र फडणवीसांच्या काकू.
राजकारणात प्रवेश केल्यावर नव्वदच्या दशकात त्यांनी नागपूरचे महापौरपद सांभाळले व 1999 साली विधानसभेवर फडणवीस पहिल्यांदाच निवडून आले. मुख्य म्हणजे ते मुख्यमंत्री होण्या आधी त्यांनी एकही मंत्रिपद कधीही भूषवलं नव्हतं.
सुरुवातीच्या काळात फडणवीसांनी नितीन गडकरी यांच्या पाऊलावर पाऊल टाकत राजकारणातील वाटचाल सुरु केली. पण नंतर त्यांनी नितीन गडकरींची साथ सोडत, गोपीनाथ मुंडेंचा हात धरला. आणि मुंडेंच्या गटासोबत राहून त्यांनी 2013 साली प्रदेशाध्यक्ष बनण्याचा मान मिळवला.
मुख्यमंत्री पदापर्यंत कशी केली कूच?
२०१३ साली देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. हे पद त्यांच्या मुख्यमंत्री होण्यात नक्कीच कामी आलं. नंतर निवडणूक झाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त सीट भाजपच्या निवडून आल्या, हे ही त्यांना मुख्यमंत्री पद मिळण्यासाठी फायद्याचं होतं.
पहा Devendra Fadnavis यांच्या कामाविषयी काय म्हणाल्या पत्नी Amruta Fadnavis
पण त्यांच्या मुख्यमंत्री बनण्या मागे अजूनही काही महत्त्वाचे मुद्दे होते. ते म्हणजे भाजपची आखलेली स्ट्रॅटेजी अशी होती की प्रत्येक राज्यांत तेथील बहुसंख्य समुदायाचा मुख्यमंत्री न देता तुलनेनं अल्पसंख्याक असलेल्या समुदायातील नेत्याला मुख्यमंत्रिपद देणे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात बिगर-मराठा असलेल्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळाले.