
महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत घट होत असताना राज्यासमोर झिका व्हायरसचे (Zika Virus) नवीन संकट उभे राहिले आहे. पुण्यात (Pune) झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, झिका व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. याचपार्श्वभूमीवर पुण्यातील बेलसर गावात ग्रामपंचायतीकडून चक्क मोफत कंडोम (Condoms) वाटण्यात येत आहेत. झिका व्हायरस आणि कंडोम वाटपाचा नेमका संबंध काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचे कारण आता समोर आले आहे.
पुण्यात झिकाचा रुग्ण सापडल्याने त्याचा संसर्ग पसरू नये, यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. झिका व्हायरसचा धोका लक्षात घेता महिलांनी पुढील 4 महिने गर्भधारणा टाळावी, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर पुण्यातील बेलसर गावात सरपंच आणि आरोग्य संस्थेकडून मोफत कंडोम वाटण्याचा उपक्रम राबवला जात आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 79 गावांमध्ये झिकाचा संसर्ग पसरल्याचा अंदाज असून आरोग्य विभागाने तपासण्या सुरू केल्या आहेत. हे देखील वाचा- Delta Plus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आतापर्यंत 66 जणांना डेल्टा व्हायरसची लागण, तर 5 जणांचा मृत्यू
एडिस एजिप्त डासापासून झिका विषाणूचा संसर्ग होतो. महत्वाचे म्हणजे, गरोदर महिलांना झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. झिका व्हायरसमुळे गरोदर महिलांच्या पोटातील बाळावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच अकाली प्रसूती होण्याचा धोकाही अधिक असतो. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झिका व्हायरस पुरुषांच्या विर्यात तब्बल चार महिने राहू शकतो. यामुळे महिलांनी पुढील 4 महिने गर्भधारणा टाळली पाहिजे. यासाठी अनेक गावात जनजागृती केली जात आहे.
झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत?
रुग्णाला अचानक ताप येतो आणि भरपूर थंडी वाजते, डोके प्रचंड प्रमाणात दुखू लागते, घशात कायम दुखणे, सांध्यामध्ये वेदना सुरु होतात आणि रुग्णाच्या मानेवर छातीवर आणि चेहऱ्यावर गुलाबी रंगाचे चट्टे येतात.
झिका व्हायरसच्या संसर्गावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाहीत. यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच यापैकी कोणतेही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवले पाहिजे.