Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या पार आणि मुंबईत 116 वर कोरोना ग्रस्तांचा आकडा झाल्याने ही परिस्थिती अत्यंत गंभीर्याने घेतली पाहिजे. ऐवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधत येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवासुविधा वगळता अन्य गोष्टींसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र या काळात काळाबाजाराच्या गोष्टी सुद्धा समोर येत असून मुंबई पोलिसांकडून याच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. तर आता नागरिकांना एखाद्या गोष्टीची तक्रार नोंदवायची असल्यास मुंबई पोलिसांचे पथक थेट तुमच्या दाराजवळ येणार आहे.

पीटीआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लॉकडाउनची परिस्थिती पाहता सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. या दरम्यान नागरिकांना जर एखाद्या गोष्टीसंबंधित तक्रार नोंदवायची असल्यास त्यांना घराबाहेर पडावे लागणार नाही आहे. कारण आता पोलिसांचे पथक थेट तुमच्या दारी तक्रारींची नोंद घेण्यासाठी हजर राहणार आहेत.(Coronavirus: मुंबई पोलिसांकडून 1 करोड रुपयांची किंमत असलेले 200 मास्कचे बॉक्स जप्त, 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल)

रविवारच्या लॉकडाउनच्या परिस्थितीनंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गर्दी दिसून आली. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. तसेच नागरिकांना घरी बसण्यास सांगितले तरीही ते घराबाहेर पडत आहेत. सोमवारी तर चक्क गाड्या घेऊन टोल नाक्याजवळ गर्दी केल्याचे दिसून आले होते. ऐवढेच नाही लॉकडाउनच्या परिस्थितीत नागरिक उगागच बाहेर फिरत असल्याने पोलिसांनी तर आता त्यांना पोकळ बांबूचे फटके देण्यास सुरुवात केली आहे.