Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  महाराष्ट्रातील आकडा पाहता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे ही म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांकडून मास्क, हॅन्डसॅनिटायझर सारख्या गोष्टी खरेदी केल्या जात आहेत. परंतु काही जण कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मास्क आणि हॅन्डसॅनिटायझरचा काळाबाजार करत असल्याचे प्रकार गेल्या काही दिवसात उघडकीस आले आहेत. तर आता पुन्हा मुंबई पोलिसांकडून 200 मास्कचे बॉक्स जप्त करण्यात आले असून 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीटीआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी धाड टाकत तब्बल 200 मास्कचे बॉक्स जप्त केले आहेत. या बॉक्समधील मास्कची किंमत जवळजवळ 1 कोटी रुपये आहे. तसेच ज्या ठिकाणाहून हे मास्क जप्त केले आहेत तेथील 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मंगळवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोना सारख्या परिस्थितीत अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक केल्याची माहिती दिली होती.(Coronavirus: अंधेरी, भिवंडी मधून 15 कोटी रुपयांचे मास्क जप्त; काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक: अनिल देशमुख)

दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांनी अंधेरी,भिवंडी येथील गोदामांवर छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी 15 कोटी किंमत असलेले मास्क जप्त केले आहेत. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक सुद्धा केले.