Third Battle of Panipat: पानिपतच्या 3 ऱ्या लढाईपासून सुरु झाला मराठेशाहीचा ऱ्हास; जाणून घ्या या युद्धात का झाला मराठ्यांचा पराभव ?
Panipat Film (Photo Credits: Instagram)

भारतीय भूमीत जितक्या लढाया झाल्या त्यापैकी पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या (Third Battle of Panipat) जखमांच्या खुणा आजही मराठ्यांच्या हृदयावर ताज्या आहेत. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, स्त्रिया व पुरुष मरण पावले. तब्बल 22  हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले होते. अशी ही रक्तरंजित लढाई आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. मराठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker),आपल्या आगामी ‘पानिपत’ (Panipat) या चित्रपटामधून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास मांडणार आहेत. याच लढाईमधील पराभवानंतर मराठेशाहीची उतरती कळा सुरु झाली. आज या चित्रपटानिमित्त चला पाहूया या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव नक्की का झाला.

हातखंड कामी आला नाही – मराठे सैनिक गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध होते. महाराष्ट्रात असलेल्या गड किल्ल्यांमुळे मराठ्यांनी अनेक लढाया गनिमी काव्याने जिंकल्या. याचमुळे पानिपतच्या विशाल मैदानावरची लढाई जिंकणे त्यांच्यासाठी अवघड ठरले.

धार्मिकता – मराठे त्यांच्या धार्मिक स्वभावासाठी प्रसिद्ध होते. पेशव्यांनी जेव्हा पानिपतच्या लढाईचा बेत आखला तेव्हा, उत्तरेकडील धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी जनता सैनिकांसोबत रवाना झाली. एक-एक करत तब्बल लाखभर लोक सैनिकांसोबत गेले होते. अशावेळी सैनिकांना मिळणाऱ्या रसदेमधील जास्त रसद या जनेसाठी खर्च होत होती. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे मराठ्यांच्या आक्रमणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. सैनिक लढण्याऐवजी या बुणग्यांच्या रक्षणावर त्यांची शक्ती खर्च झाली.

मदत मिळण्यास अडचण – पानिपतच्या या लढाईच्या आधी जवळजवळ 50 वर्षांपासून मराठ्यांचा देशात डंका होता. उत्तरेत मराठ्यांनी सत्ता काबीज करून अनेक ठिकाणी सक्तीची कर वसुली केली होती. याच कारणामुळे उत्तरेकडील अनेक राजे मराठ्यांवर नाराज होते. अब्दालीने हीच गोष्ट ओळखून मराठ्यांना कुठूनही मदत मिळू नये अशी व्यवस्था केली. (हेही वाचा: Panipat Trailer: मराठेशाहीची पाळेमुळे हलवणारी पानिपतची लढाई मोठ्या पडद्यावर; ट्रेलरवरून चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज (Video)

निसर्ग – उत्तरेकडे सर्वसाधारण असलेल्या थंड वातावरणाशी मराठे जुळवून घेऊ शकले नाहीत. त्यात जानेवारीच्या दरम्यान पानिपतच्या आसपासच्या गावांमधली झाडेही शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे सरपणाला लाकडे मिळणे मराठा फौजेला कठीण झाले होते.

व्यूहरचना चुकली – मराठे गनिमी कावा करण्यात तरबेज होते मात्र पानिपतचे युद्ध मैदानावर होणार आहे हे ओळखून त्यांनी गोलाची व्यूहरचना आखली. मात्र सैनिकांना याची सवय नसल्याने अब्दालीने ही व्यूहरचना मोडीत काढली.

रिकामी अंबारी – लढाईमध्ये विश्वासरावांना गोळी लागल्यावर ते धारातीर्थी पडले, त्यानंतर सदाशिवराव भाऊ अंबारीमधून उतरून  लागली आणि ते धारातीर्थी पडल्यावर अंबारीतून उतरले व त्यांनी घोड्यावर मांड ठोकली. सदाशिवराव भाऊंची अंबारी रिकामी दिसल्याने विश्वासरावांसोबत सदाशिवरावही धारातीर्थी पडले असा समज सैन्यांचा झाला व त्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली.

दरम्यान, पानिपत या चित्रपटात अर्जुन कपूर हा सदाशिवरावभाऊ यांची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री क्रिती सेनन पार्वती बाईंची भूमिका साकारत आहे, तर संजय दत्त या चित्रपटात अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे.