Panipat Trailer:  मराठेशाहीची पाळेमुळे हलवणारी पानिपतची लढाई मोठ्या पडद्यावर; ट्रेलरवरून चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज  (Video)
Panipat Trailer (Photo Credits: YouTube)

भारतीय भूमीत जितक्या लढाया झाल्या त्यापैकी पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या जखमांच्या खुणा आजही मराठ्यांच्या हृदयावर ताज्या आहेत. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, स्त्रिया व पुरुष मरण पावले. तब्बल 22  हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले होते. अशी ही रक्तरंजित लढाई आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. मराठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker),आपल्या आगामी ‘पानिपत’ (Panipat) या चित्रपटामधून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास मांडणार आहेत. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

पानिपत ट्रेलर -

जोधा अकबर, मोहेंजोदारो, लगान अशा ऐतिहासिक चित्रपटानंतर आशुतोष पेशवाईचा इतिहास पडद्यावर दाखवण्यास सज्ज झाले आहेत. 1761 साली घडलेल्या या पानिपतच्या लढाईमुळे मराठेशाहीची पाळेमुळे हलली होती. ट्रेलरच्या सुरुवातीलाच पानिपतच्या रणभूमीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेले सैन्य व लढाई दिसते. या पहिल्याच काही शॉट्सवरून चित्रपट किती भव्य असेल याचा अंदाज येतो. त्यानंतर हळू हळू पेशवाई उलगडत जाते. आशुतोष गोवारीकर यांचा ऐतिहासिक चित्रपटांमध्ये हातखंड असल्याने तसेच ते स्वतः मराठी असल्याने पेशवाईचे हुबेहूब चित्रण या ट्रेलरमध्ये दिसून येते. कला दिग्दर्शन आणि छायाचित्रण यांचा सुरेख संगम साधल्याने अनेक शॉट्स अतिशय सुंदर दिसतात.

पुढे ही लढाई नक्की का घडली याचे स्पष्टीकरण देणारे शॉट्स दिसतात. या सर्वांमध्ये डोळ्यात भरते ते कलाकारांचे लुक्स आणि प्रसंगांची भव्यता. दोन्ही गोष्टींवर प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येते. मात्र ट्रेलर अखेर अनेक गोष्टी खटकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण ट्रेलरमध्ये जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत आणि मनकर्णिका या चित्रपटांसारखे अनेक शॉट्स दिसून येतात. ट्रेलरमध्ये कुठेही नाविन्यता दिसून येत नाही. या चित्रपटात अर्जुन कपूर हा सदाशिवरावभाऊ यांची भूमिका साकारत आहे. मात्र कोणत्याच प्रकारे अर्जुनने या भूमिकेला न्याय दिला नाही. इतक्या मोठ्या ऐतिहासिक चित्रपटाच्या मानाने अर्जुनचा अभिनय आणि संवादफेक अतिशय फिकी वाटते. नाही म्हणायला पार्श्वसंगीतामुळे ट्रेलरला एक ठराविक उंची प्राप्त झाली आहे. (हेही वाचा: एव्हरग्रीन अभिनेत्री 'जीनत अमान' रुपेरी पडद्यावर करणार कमबॅक, अभिनेता अर्जुन कपूर ही असणार महत्त्वपुर्ण भूमिकेत)

अभिनेत्री क्रिती सेनन पार्वती बाईंची भूमिका साकारत आहे, तर संजय दत्त या चित्रपटात अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल, कुणाल कपूर, सुहासिनी मुळे, रवींद्र महाजनी, झीनत अमान, गश्मीर महाजनी इ. कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. चित्रपटामधील गीते जावेद अख्तर यांची आहेत. कला दिग्दर्शन नेहमी प्रमाणेच नितीन चंद्रकांत देसाई यांचे आहे. असा हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.