Make My Trip Sees Rise In Turkey, Azerbaijan Trip Cancellations | X and Pixabay.com

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आता अनेकांनी पाकिस्तानला पाठिंबा देणार्‍या तुर्की (Turkey) आणि अझरबैझान (Azerbaijan) या देशांमध्ये पर्यटनावर स्वेच्छेने बंदी घातली आहे. तुर्की मधून येणार्‍या अनेक पदार्थांची देखील खरेदी आता मंदावली आहे. भारतातील सर्वात मोठ्या ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म MakeMyTrip ने देखील या दाव्याची पुष्टी केली आहे. त्यांच्या एका निवेदनानुसार, तुर्की आणि अझरबैजानमधील बुकिंगमध्ये मोठी घट झाली आहे.

आज (14 मे) जारी त्यांच्या निवेदनामध्ये "गेल्या एका आठवड्यात भारतीय प्रवाशांनी तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर, अझरबैजान आणि तुर्कीसाठी बुकिंगमध्ये 60% घट झाली होती. तर त्याच कालावधीत या देशांमधील सहलींचे रद्दीकरण आता 250% पर्यंत वाढले आहे."

जरी प्लॅटफॉर्मने त्यांच्या वेबसाइटवर तुर्की आणि अझरबैजानसाठी फ्लाइट बुकिंग देणे थांबवले नसले तरी, MakeMyTrip ने दिलेल्या माहितीनुसार 'आपल्या राष्ट्रासोबत एकता आणि आपल्या सशस्त्र दलांबद्दलच्या आदरापोटी, आम्ही या भावनेचे समर्थन करतो आणि सर्वांना अझरबैजान आणि तुर्कीला अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला देतो. या दोन ठिकाणांना पर्यटनाला परावृत्त करण्यासाठी आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरील सर्व जाहिराती आणि ऑफर आधीच बंद केल्या आहेत.'

पुण्यात, गाझियाबाद मध्ये  टर्कीच्या सफरचंदांवरही बहिष्कार

पुण्यात व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून येणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार घातला आहे. मार्केट यार्डमध्ये येणारी तुर्कीची सफरचंद येण्यास बंद झाली असून इतर देशातून येणाऱ्या सफरचंदांना नागरिक पसंती देत आहेत. नक्की वाचा:  JNU ने स्थगित केला Turkiye च्या Inonu University सोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार; 'राष्ट्रीय सुरक्षेचं' कारण. 

टर्की हा पर्यटनावर अवलंबून असलेला देश आहे, देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा 12 टक्के आहे. देशातील एकूण रोजगाराच्या 10 टक्के वाटा पर्यटन क्षेत्राचा आहे. भारत हा तुर्कीच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्त्रोत बाजारपेठांपैकी एक आहे. पण आता भारतीयांच्या 'बॉयकॉट टर्की' अजेंडामुळे त्याला मोठा फटका बसणार आहे.