Vat Purnima 2019:  'हे' तीन वर मागून यमाकडून परत मिळवले होते सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण, जाणून घ्या कथा
Vat Purnima 2019 (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सातही जन्म हाच पती मिळावा म्हणून, तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया वटपौर्णिमेचे (Vat Purnima) व्रत, उपवास करतात. या व्रतात वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून, दोऱ्याचे वेष्टन दिले जाते. त्याची मनोभावे पूजा करून वाण लुटले जाते. पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी महाराष्ट्रात 16 जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाईल. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते, वटवृक्षाला संस्कृतमध्ये ‘अक्षयवृक्ष’ असे म्हटले जाते, म्हणजेच ज्याचा कधी विनाश होत नाही असा वृक्ष म्हणून वडाचे झाड. यामागे सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले या घटनेची आख्यायिकाही आहे.

वटपौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत असेही म्हटले जाते. याच दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते. यमाकडे सावित्रीने तीन वर मागितले होते, जे पूर्णत्वास नेण्यासाठी यमाला सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. चला पाहूया काय होते हे वर

वटपौर्णिमेची कथा - 

भद्र देशाचा राजा अश्वपती, त्याची कन्या ही सावित्री. सावित्री अतिशय रूपवान, गुणी व नम्र मुलगी होती. उपवर झाल्यावर सावित्रीने पती म्हणून सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा एका अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून पराभव झाल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता. भगवान नारदांना सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच आहे, हे माहित असल्यामुळे त्याच्याशी लग्न करू नकोस असा सल्ला सावित्रीला दिला. (हेही वाचा: वटपौर्णिमा दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडालाच का दोरा गुंडाळतात? जाणून घ्या कारण)

सावित्रीने ही गोष्ट मान्य केली नाही आणि तिने अल्पायुषी सत्यवानाशीच लग्न केले. त्यानंतर सावित्री सत्यवान आणि त्याच्या आई-वडिलांसोबत जंगलात राहू लागली. त्यांची सेवा करू लागली. बघता बघता एक वर्ष पूर्ण होत आले. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा होणार होता त्याआधी तीन दिवस तिने उपवास करून व्रत केले. ज्यादिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता, त्या दिवशी सावित्रीही सत्यवानासोबत जंगलात लाकडे तोडण्यास निघाली. सत्यवान लाकडे तोडत होता, आणि सावित्री ती लाकडे गोळा करत होती. लाकडे तोडता तोडता अचानक सत्यवानाला चक्कर आली, तो जमिनीवर पडला.

यमराजांनी सत्यवानाचे प्राण घेतले व ते निघू लागले. पती वियोगाने दुःखी झालेली सावित्रीही यमराजाच्या पाठीमागे निघाली. यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले पण सावित्रीने साफ नकार दिला. अखेर यमराजाने तिचा पिच्छा सोडवण्यासाठी तिला तीन वर मागण्यास सांगितले, जेणेकरून ती परत जाईल. इथे सावित्रीची कसोटी होती. पतीचा प्राण परत घेऊनच जाईन असा ठाम निश्चय केलेल्या सावित्रीने, सासूसासऱ्याचे डोळे, त्यांचे राज्य आणि शेवटी आपल्याला 100 पुत्र व्हावेत असा वर मागितला. यमराज अनावधानाने तथास्तु म्हणून गेले. मात्र वचनबद्धतेमूळे त्यांना सावित्रीला पुत्र होण्यासाठी तिच्या पतीचे प्राण परत करावे लागले. अशा तऱ्हेने भारतीय संस्कृतीत सत्यवान सावित्रीची कथा आणि हे व्रत अजरामर झाले

सावित्रीने सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणूनही ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून हे व्रत करतात.