हिंदू धर्मात ‘महाशिवरात्री’ (Maha Shivratri) च्या दिवसाला फार महत्व आहे. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. या दिवशी शिवाची आराधना, पूजा-अर्चना, उपवास करून महादेवाची प्रार्थना केली जाते. या दिवशी पिंडीला अभिषेक घालून, रात्रीच्या चार प्रहरी शिवाची विशेष पूजा केला जाते. यावर्षी 4 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. या दिवसाचे औचित्य साधून अनेक लोक महत्वाच्या शिवा मंदिरांना अथवा ज्योतिर्लिंगां (Jyotirlinga) ना भेट देतात. देशात महादेवाची 12 ज्योतिर्लिंगे आहेत, यापैकी 5 आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाशिवरात्रीला या ज्योतिर्लिंगांना भेट देण्याचे विशेष महत्व आहे. चला पाहूया महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांचे महत्व
परळी वैजनाथ -
हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात आहे, इथे इ. स. 1186 चा एक शिलालेख आहे, त्यावर या मंदिराची माहिती मिळते. बाराव्या शतकातच येथे घाट बांधले गेले. इ. स. 1706 मध्ये अहिल्याबाई होळकरांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासंबंधी संस्कृत शिलालेख या मंदिरात आहे. परळी वैजनाथला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते.
घृष्णेश्वर -
शिवशंकराच्या उपासकांसाठी पवित्रस्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी होत असते. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी इ.स. 1765 ते 1795 दरम्यान घृष्णेश्र्वराचे संपुर्ण मंदिर बांधून त्यावर नक्षीकाम करून घेतले. घृष्णेश्वर दर्शनासाठी सर्व पुरुषां चामड्याच्या वस्तू वस्तू बाहेर काढून ठेवाव्या लागतात. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. या मंदिराला 27 सप्टेंबर, इ.स. 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
भीमाशंकर -
पुण्यापासून 110 किलोमीटरवर असलेले हे तीर्थस्थान पश्चिम घाटात वसले आहे. भीमा नदीही याच परिसरात उगम पावते. शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला. त्यानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. महाशिवरात्रीत इथे भव्य यात्रा भरते, सोमवती अमावस्या, कार्तिक पौर्णिमेस उत्सव होतो. (हेही वाचा: जाणून घ्या 'महाशिवरात्री'चे महत्व, पूजा विधी, मंत्र आणि कसा करावा उपवास)
औंढा नागनाथ -
औंढा नागनाथ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव व तालुका आहे. पांडवांच्या 14 वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. इथे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही, तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे हे येथील वैशिष्ट्य आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक, ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता.
त्र्यंबकेश्वर-
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्याही प्रतिमा आहेत. याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते.