महाशिवरात्री 2019 (Photo Credits: File Image)

माघ कृष्ण चतुर्दशी हा दिवस भारतात महाशिवरात्री (Maha Shivaratri) म्हणून साजरा केला जातो. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो, शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात. प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व (अव्यक्त दिव्यत्वाचे रूप) आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते. तसेच याच दिवशी पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला होता, असेही काही लोक मानतात. संपूर्ण वर्षांत आपण जे उपवास करतो त्यामध्ये महाशिवरात्रीच्या उपवासाला विशेष महत्व आहे. येत्या 4 मार्च देशात सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जाईल, त्या निमित्ताने चला पाहूया काय आहे या दिवसाचा पूजा विधी आणि महत्व

पूजा विधी –

उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगाला लेपन केले जाते. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा केली जाते. शिवरात्रीच्या दिवशी प्रदोषकाळी स्फटिक शिवलिंगास शुद्ध गंगाजल, दूध, दही, तूप, मध व साखर ह्याने अभिषेक केल्यानंतर धूप - दीप प्रज्ज्वलित करून व मंत्र जप केल्याने सर्व अडचणी दूर होतात.

या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरी दुधाने, दुसऱ्या प्रहरी दह्याने, तिसऱ्या प्रहरी तुपाने तर शेवटच्या आणि चौथ्या प्रहरी मधाने शिवलिंगाला अभिषेक केल्याने इच्छित कामना पूर्ण होतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. महाशिवरात्रीला शिवपुराण पठण फायदेशीर ठरते, शिवआराधना स्तोत्रांचे वाचनही लाभदायक असते. (हेही वाचा: घरातील साध्या आरश्यासह इतर अनेक गोष्टी ठरू शकतात दुर्भाग्याचे कारण)

दुसर्‍या दिवशी तीळ-खीर तसेच बेलपत्रांचे हवन करून ब्राह्मण भोजन घालावे. शंकराला अर्पण केलेला नैवेद्य खाणे वर्ज्य आहे. हा नैवेद्य खाल्ल्याने खाणार्‍याला, नरकातील दु:ख भोगावे लागते.

महाशिवरात्री 2019 पर्व तिथी व मुहूर्त -

निषिद्ध काल पूजा - 00.07 ते 00.57

उपवास सोडण्याची वेळ – 06.46 ते 15.26 (5 मार्च)

चतुर्दशी तिथी प्रारंभ - 4 मार्च 2019, सोमवार, 16.28

चतुर्दशी तिथी समाप्ती - 5 मार्च 2019, मंगळवार, 19.07

या गोष्टी कराव्या –

शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालावे

शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरावा

शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापराव्या

शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वहावीत

शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी

जो मनुष्य शिवरात्रीला भगवान शंकराची पाच मंत्रांसहित गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पंचोपचारांनी पूजा करतो, तो पापमुक्त होतो असे सांगितले आहे,

मंत्र –

ओम सद्योजातायनमः, ओम वामदेवायनमः, ओम अघोरायनमः, ओम ईशानायनमः आणि ओम तत्पुरुषायनमः असे हे पाच मंत्र आहेत.