World Heart Day :  हार्ट अटॅक आणि कार्डिएक अरेस्टनंतर रूग्णांना दुसरा जन्म देणारा गोल्डन अव्हर म्हणजे काय ?
हार्ट अटॅक Photo Credits Pixabay

जेव्हा जगण्या मरणाचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. प्रामुख्याने हृद्यविकारामध्ये रूग्णांना वेळीच योग्य वैद्यकीय मदत मिळणं गरजेचे असते. हार्ट अटॅकमध्ये काही मिनिटांत तर कार्डिएक अरेस्टमध्ये काही सेकंदातच सारा खेळ संपतो. अनेकदा रूग्णांना नेमका हार्ट अटॅक आणि कार्डिएक अरेस्ट यांच्यामधला नेमका फरकच समजत नाही. त्यामुळे प्रथमोपचार आणि त्यापुढील वैद्यकीय मदत मिळण्यासही उशिर होतो. गोल्डन अव्हर हा हृद्यविकाराच्या रूग्णांसाठी जणू दुसर्‍या जन्माचा अनुभव देण्यासारखा आहे. मग पहा हार्ट अटॅक आणि कार्डिएक अरेस्टमध्ये नेमका हा गोल्डन अव्हर कसा फायदेशीर ठरतो.

गोल्डन अव्हर म्हणजे काय ?

कोणत्याही अपघातानंतर, मेडिकल इमरजन्सीनंतर काही काळ हा त्या रूग्णासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या वेळेवर रूग्णाचं भविष्य अवलंबून असते. गोल्डन अव्हर हा काही सेकंदापासून ते अगदी काही मिनिटांपर्यंत असू शकतो.

हार्ट अटॅकच्या रूग्णांमध्ये किमान तासाभरात रूग्णाला वैद्यकीय उपचार आवश्यक असतात तर कार्डिएक अरेस्टमध्ये काही सेकंद अत्यंत महत्त्वाची असतात. हार्ट अटॅक जीवावर बेतण्यापूर्वीच ठेवा या ५ गोष्टींचं भान

हार्ट अटॅक आणि कार्डिएक अरेस्टचा गोल्डन अव्हर

हार्ट अटॅकमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये चरबीमुळे अडथळा आल्याने, रक्ताच्या गुठळ्या झाल्याने, ऑक्सिजनयुक्त रक्त हृद्यापर्यंत न पोहचल्याने अडथळा येतो. परिणामी यामधून हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅक आल्यानंतर काही मिनिटं किंवा तासभर त्यावर मात करून रूग्ण मृत्यूचा सामना करू शकतो. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा शरीराच्या इतर भागांना वेळेत न झाल्यास त्यामधून इतर गुंतागुंतीच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे हार्ट अटॅकनंतर तासाभरात रूग्णाला वैद्यकीय उपचार मिळणं गरजेचे आहे. अन्यथा त्यातून स्ट्रोक, कार्डिएक अरेस्टचा धोका बळावू शकतो. World Heart Day : हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही '6' लक्षणे !

हार्ट अटॅकच्या तुलनेत कार्डिएक अरेस्ट हा प्रकार अत्यंत जीवघेणा आहे. यामध्ये हृद्याच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने हृद्य अचानक बंद होते. अचानक मेंदूला, शरीरातील इतर अवयवांना होणारा रक्तपुरवठा थांबल्याने रूग्ण शुद्ध हरपून कोसळतो. यामध्ये cardiopulmonary resuscitation म्हणजेच रूग्णाच्या छातीवर विशिष्ट दाब देणं गरजेचे आहे. सुमारे मिनिटाला 120 दाब दिल्याने हृद्याचे कार्य पुन्हा अंशतः कार्यान्वित करण्यास मदत होते. वैद्यांची मदत मिळवण्यापूर्वी कोणत्याही स्वरूपात कार्डिएक अरेस्टच्या रूग्णाला सीपीआर देणं हे रूग्णासाठी फायदेशीर ठरू शकते.