
Skin Care Tips For Winter: नोव्हेंबर महिना सुरू झाला असून थोडीशी थंडी जाणवू लागली आहे. हिवाळा (Winter) काही बाबतीत चांगला असला तरी काही बाबतीत त्रासदायक असतो. कारण, या ऋतूत त्वचेशी संबंधित समस्या उद्धभवतात. या ऋतूमध्ये आपली त्वचा कोरडी होते, त्यामुळे सतत खाज सुटते. लक्ष न दिल्यास एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी हवामानानुसार आपल्या त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे.
हिवाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी -
कोमट पाणी वापरा -
हिवाळ्यात गरम आंघोळ करायला कोणाला आवडत नाही, पण गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलकटपणा नष्ट होतो, त्यामुळे कोरडेपणा वाढतो. जे लोक आंघोळीनंतर लगेच त्वचेला मॉइश्चरायझ करत नाहीत, त्यांच्या त्वचेवर क्रॅक आणि हिवाळ्यातील एक्जिमा फार लवकर दिसतात. त्यामुळे यासाठी कोमट पाणी वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कोमट पाण्याने अंघोळ केल्यानंतर चेहऱ्यावर नैसर्गिक हायड्रेटिंग पदार्थ असलेले चांगले मॉइश्चरायझर लावावे. त्यामुळे त्वचेतील ओलावा दीर्घकाळ टिकेल. (हेही वाचा - Weight-loss Injection: आता इंजेक्शन घेऊन कमी करू शकता लठ्ठपणा; ब्रिटनमध्ये झाले लाँच, जाणून घ्या सविस्तर)
सनस्क्रीन लावा -
अतिनील किरणं उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यात देखील त्वचेसाठी हानिकारक असतात. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या दुष्परिणामांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी आपण सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे.
आयुर्वेदिक स्किनकेअर वापर करा -
संपूर्ण हिवाळ्यात त्वचेचा मुलायमपणा टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक उत्पादने जपून वापरा. नैसर्गिक वस्तूंनी चेहरा धुवा. त्यानंतर हलके मॉइश्चरायझर लावा आणि सनस्क्रीन आणि रात्रीही मॉइश्चरायझर लावा.
हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन -

त्वचेच्या बाह्य काळजी व्यतिरिक्त, आपल्या आहाराची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. अँटिऑक्सिडंट-समृद्ध हंगामी फळे आणि भाज्या (जसे की स्ट्रॉबेरी, संत्री, द्राक्षे, फ्लॉवर, पालक, गाजर, मटार इ.) खाल्ल्याने थंड हवामानात शरीरातील मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास आणि त्वचा सुंदर ठेवण्यास मदत होते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड (साल्मन, अंडी आणि बदाम) सारखे इतर पदार्थही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. याशिवाय शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
तळपायाची काळजी घ्या -
थंडीच्या मोसमात त्वचेसोबतच पायाची आर्द्रताही कमी होते. त्यामुळे टाचांना तडे जातात आणि पाय घाण दिसतात. त्यामुळे यासाठी नैसर्गिक तेल असलेली फूट क्रीम वापरावी. तसेच डेड स्किन काढण्यासाठी पाय स्क्रब करा.
भरपूर पाणी प्या -
त्वचेची बाह्य काळजी घेण्यासोबतच अंतर्गत काळजी विसरू नका. यासाठी भरपूर पाणी प्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या हंगामात तुमच्या घरात ह्युमिडिफायरही लावू शकता. हे घरातील कोरड्या वातावरणापासून तुमचे संरक्षण करेल.
हिवाळ्यात त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तसेच त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी वरील महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला नक्की उपयुक्त ठरतील. याशिवाय, हिवाळ्यात संतुलित आहार आणि व्यायामाच्या मदतीने सामान्य आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.