Weight-loss Injection: आता इंजेक्शन घेऊन कमी करू शकता लठ्ठपणा; ब्रिटनमध्ये झाले लाँच, जाणून घ्या सविस्तर
Weight-loss Injection (संग्रहित संपादित प्रतिमा)

लठ्ठपणा (Obesity) कमी करण्यासाठी अनेकजण वर्कआउट, जिम, डाएट प्लॅन अशा अनेक गोष्टी करतात. परंतु यामध्ये सातत्यता नसल्याने अपेक्षित चरबी कमी होत नाही. मात्र आता वजन कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यावर्षी औषध कंपनी Novo Nordisk A/S ने लठ्ठपणा कमी करण्यासाठी एक इंजेक्शन बाजारात आणले होते. या इंजेक्शनचे परिणाम अतिशय उत्साहवर्धक होते. आता हे इंजेक्शन ब्रिटनमध्येही लाँच करण्यात आले आहे. वेगोव्ही (Wegovy) असे या इंजेक्शनचे नाव आहे.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे इंजेक्शन या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आले होते. असे मानले जाते की, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांच्या जोडीने वेगोव्ही रुग्णांना शरीराचे वजन सुमारे 15% कमी करण्यास मदत करते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, या औषधाची मागणी इतकी वाढली आहे की, गेल्या तिमाहीत डॅनिश फार्मास्युटिकल कंपनीच्या महसुलात 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लार्स फ्रुएरगार्ड जोर्गेनसेन म्हणाले की, कोरोना महामारीमुळे लोक महिनोनमहिने घरात कोंडून राहिले, ज्याचा सर्वात जास्त परिणाम त्यांच्या वजनावर झाला. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी आम्ही हे इंजेक्शन बाजारात आणले आहे. अमेरिकेतील बहुतेक प्रौढ लोक अतिरिक्त चरबीच्या समस्येने त्रस्त आहेत आणि वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. म्हणूनच हे इंजेक्शन अमेरिकेत पहिल्यांदा सादर केले गेले. अमेरिकेत सात वर्षांसाठी मंजूर केलेले हे पहिले स्लिमिंग प्रिस्क्रिप्शन औषध आहे.

सध्या या इंजेक्शनची मागणी खूप आहे. म्हणूनच आता आज, सोमवारी कंपनीने ब्रिटनमध्ये त्यांचे वजन कमी करणारे इंजेक्शन वेगोव्ही लाँच केले. आतापर्यंत ते युनायटेड स्टेट्स, नॉर्वे, डेन्मार्क आणि जुलैच्या अखेरीस, जर्मनीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. दरम्यान, एफडीएच्या मते, सध्या अमेरिकेतील सुमारे 70 टक्के लोक जास्त वजनाचे किंवा लठ्ठ आहेत. लठ्ठपणा किंवा जास्त वजन ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे, जी मृत्यूच्या काही प्रमुख कारणांशी संबंधित आहे. यामध्ये हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेह यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या मते हे औषध या गंभीर आजारांचा धोकाही बऱ्याच अंशी कमी करू शकते. (हेही वाचा: 44 Medicine Price Under Control: BP, डिप्रेशनसह 'या' आजारांवरील औषधे झाली स्वस्त; NPPA ने निश्चित केल्या नवीन किंमती)

या औषधाची 14 महिन्यांहून अधिक काळ चाचणी केली गेली आहे. डायबिटीजमध्ये वापरल्या जाणार्‍या सिमाग्लुटाइड या औषधाची ही अपग्रेडेड आवृत्ती आहे. लठ्ठपणा किंवा जास्त वजन असलेल्या लोकांना हे इंजेक्शन आठवड्यातून एकदा दिले जाते. संशोधन आणि अभ्यासानंतर या औषधाला मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे ते वापरण्यास सुरक्षित मानले जाऊ शकते. मात्र हे औषध वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(वरील लेख इंटरनेट प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. औषधाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)