Norovirus: केरळमधील 19 विद्यार्थ्यांमध्ये आढळला नोरोव्हायरस; जाणून घ्या काय आहे हा संसर्गजन्य विषाणू, त्याची लक्षणे आणि कसा कराल बचाव
Coronavirus | Image Used For Representational Purpose | (Photo Credit: IANS)

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये बिघडलेल्या परिस्थितीमुळे भारतही अलर्ट मोडवर आहे. मात्र याच दरम्यान देशात आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ताज्या माहितीनुसार, केरळमध्ये नोरोव्हायरसच्या 19 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने सोमवारी माहिती दिली. या विषाणूची प्रकरणे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दक्षिणेकडील राज्यात विषाणू आढळण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी, संसर्गजन्यतेचे उच्च प्रमाण हे धोक्याचे कारण आहे, कारण आतापर्यंत नोंदवलेली सर्व प्रकरणे लहान मुलांमध्ये दिसून आली आहेत.

'संसर्गजन्य परंतु उपचारास सुलभ' अशा हा विषाणू जुलाब आणि उलट्याशी संबंधित आहे. यापूर्वी गेल्या वर्षी जूनमध्ये या विषाणूने दक्षिणेकडील राज्यात हाहाकार माजवला होता. जून 2021 मध्ये नोरोव्हायरसचा पहिला उद्रेक झाला तेव्हा, अलाप्पुझा आणि जवळपासच्या नगरपालिकांमध्ये तीव्र अतिसाराच्या आजाराची 950 प्रकरणे समोर आली होती, जी या विषाणूशी निगडीत होती.

आता विषाणूच्या अत्यंत संसर्गजन्य स्वरूपामुळे संपूर्ण राज्यात चिंता पसरली आहे. यामुळे राज्य सरकारने जनतेला चांगली स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरात दरवर्षी नोरोव्हायरसची अंदाजे 685 दशलक्ष प्रकरणे नोंदवली जातात, ज्यामध्ये 5 वर्षांखालील मुलांमधील 200 दशलक्ष प्रकरणांचा समावेश आहे.

नोरोव्हायरस काय आहे?

‘नोरोव्हायरस’ हा विषाणूंच्या कुटुंबाशी संबंधित असून, ज्यामुळे पीडित व्यक्तीला उलट्या आणि जुलाब होतात. हा एक व्यापक आणि संसर्गजन्य विषाणू आहे, जो संक्रमित लोक, दूषित अन्न किंवा दूषित पृष्ठभागांद्वारे पसरू शकतो. नोरोव्हायरस ‘विंटर वोमिटींग बग’ (Winter Vomiting Bug) म्हणूनही ओळखला जातो.

लक्षणे-

या विषाणूची लक्षणे साधारणपणे 24 ते 72 तासांत दिसून येतात. परंतु त्याची लक्षणे दीर्घकाळ दिसू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. नोरोव्हायरसची लागण झालेल्या काही लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत, परंतु तरीही ते इतर लोकांना संक्रमित करू शकतात. नोरोव्हायरसची काही सामान्य लक्षणे आहेत, जसे की- अतिसार, ताप येणे, मळमळ, उलट्या, पोट दुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी, पोट बिघडणे इ. (हेही वाचा: Covid-19- कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने जारी केल्या सूचना, जाणून घ्या)

कसा कराल बचाव-

या विषाणूपासून रक्षण करण्यासाठी तुम्ही स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वेळोवेळी स्वच्छ पाण्याने आणि साबणाने हात धुत रहा. याशिवाय फळे आणि भाज्या चांगल्या प्रकारे धुवून वापरा. जर तुम्ही मांसाहार विशेषत: मासे खात असाल तर ते चांगले शिजवा. तसेच, तुम्ही आजारी असाल तर घरीच रहा आणि इतर लोकांपासून दूर रहा. लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.