![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/02/1-61.jpg?width=380&height=214)
केरळमधील (Kerala) पथनमथिट्टा (Pathanamthitta) येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे केरळ पोलिसांनी एका महिला खेळाडूवर अनेक वेळा बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी चार एफआयआर नोंदवले आहेत. याप्रकरणी सहा जणांना अटकही करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात 60 हून अधिक लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. वृत्तसंस्था पीटीआयने शुक्रवारी (10 जानेवारी) पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी 18 वर्षांची झालेल्या या मुलीने वयाच्या 16 व्या वर्षापासून तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
बाल कल्याण समितीने आयोजित केलेल्या समुपदेशनादरम्यान ही बाब उघडकीस आली. मुलीच्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांनी तिच्या वागणुकीत झालेल्या बदलाची माहिती समितीला दिली होती. बाल कल्याण समिती सदस्यांनी आरोप खरे आहेत याची खात्री करण्यासाठी मुलीला समुपदेशनासाठी मानसशास्त्रज्ञाकडे नेले. बालकल्याण समितीचे अध्यक्ष म्हणाले की, हे प्रकरण ‘असामान्य’ असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. केरळ पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या संदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी एक व्यक्ती वेगळ्या प्रकरणात आधीच तुरुंगात आहे.
गैरकृत्यात प्रशिक्षक आणि वर्गमित्रांचाही सहभाग-
पाथनमथिट्टा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव एन यांनी सांगितले की, किशोरवयीन मुलीने प्रथम शाळेतील समुपदेशन सत्रात लैंगिक शोषणाविषयी सांगितले, त्यानंतर समुपदेशकांनी तिच्याशी संपर्क साधला तेव्हा बाल कल्याण समितीने हस्तक्षेप केल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला. केरळमधील पथनमथिट्टा येथे प्रशिक्षक, वर्गमित्र आणि स्थानिक रहिवाशांसह अनेकांनी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा: UP Shocker: पतीने पैशांसाठी मित्रांना पत्नीवर बलात्कार करू दिला; सौदी अरेबियातून पाहत होता व्हिडिओज, बुलंदशहरमधील धक्कादायक घटना)
अहवालात पोलिसांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, मुलीकडे वैयक्तिक फोन नव्हता, मात्र तिने तिच्या वडिलांचा मोबाईल फोन वापरून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या सुमारे 40 लोकांचे नंबर सेव्ह केले होते. या प्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि फौजदारी कायद्याच्या इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.