कोरोनानंतर इन्फ्लूएंझा विषाणू (Influenza Virus) देशभरात झपाट्याने पसरत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, गेल्या दोन-तीन महिन्यांत इन्फ्लूएंझा प्रकार A च्या H3N2 उपप्रकाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते की, हा विषाणू गर्दीच्या ठिकाणी सहज पसरतो. देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थांच्या डॉक्टरांनी याबाबत इशारा देत, होळीच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
इन्फ्लूएंझाच्या वाढत्या संसर्गाविषयी बोलताना, AIIMS दिल्लीचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, H3N2 हा इन्फ्लूएंझाचा एक नवीन प्रकार आहे आणि तो दरवर्षी म्युटेट होत राहतो. ते म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी H1N1 विषाणूमुळे साथीचा रोग सुरू झाला होता. H3N2 हा त्याच विषाणूचा नवीन स्ट्रेन आहे. हा विषाणू दरवर्षी बदलत राहतो. गुलेरिया म्हणतात, या व्हायरसमुळे रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी, याचा अर्थ असा नाही की ही चिंतेची बाब नाही. (हेही वाचा: H3N2 Virus Symptoms: भारतात H3N2 व्हायरसची दहशत! ICMR ने दिला इशारा; काय आहेत 'इन्फ्लूएंझा A एच3एन2 व्हायरस' ची लक्षणे आणि उपाय? जाणून घ्या)
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, इन्फ्लूएंझाच्या बाबतीत तापासोबत घसा खवखवणे, खोकला, अंगदुखी आणि नाक वाहणे ही लक्षणे दिसतात. हा विषाणू म्यूटेट झाला आहे आणि लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीही कमी झाली आहे, त्यामुळेच हा सध्या वेगाने पसरत आहे. गुलेरिया यांनी सांगितले की, दोन कारणांमुळे याची प्रकरणे वाढत आहेत. पहिले म्हणजे हवामानातील बदल आणि दुसरे म्हणजे, कोविडनंतर लोकांनी मास्क घालणे बंद केले आहे. म्हणूनच या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे आणि शारीरिक अंतर ठेवणे गरजेचे आहे.
डॉ. गुलेरिया हे इंस्टिट्यूट ऑफ इंटर्नल मेडिसिन अँड रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिनचे वैद्यकीय शिक्षणाचे अध्यक्ष आणि संचालक आहेत. दरम्यान, इन्फ्लूएंझाचे बहुतेक रुग्ण कोणत्याही वैद्यकीय उपचाराशिवाय बरे होतात, परंतु काही प्रकरणांमध्ये हा आजार गंभीर ठरू शकतो आणि रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याच्या गरज आहे.