जाणून घ्या घरी आयसोलेशनमध्ये असलेल्या Covid-19 च्या रुग्णांनी नक्की कशी काळजी घ्यावी; सरकारने जारी केले Dos and Don’ts
Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

कोविड-19 (Coronavirus) ची सौम्य बाधा झालेली असेल तर प्रारंभीच लक्षणे दिसून आल्यानंतर, घरामध्येच उपचार केल्यानंतर बहुतेक लोक लवकर पूर्ण बरे होतात हे आता स्पष्ट झालेले आहे. अशा रुग्णांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी, स्वत:ला घरातल्या इतर सदस्यांपासून वेगळे राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि वैद्यकीय ज्ञान यावर आधारित, सरकारने गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. देशभरातील 14 कोरोना दक्षता केंद्राच्या तज्ञांनी अलीकडेच ‘कोविड-19 गृह विलगीकरण व्यवस्थापन’ या विषयावर एम्सच्या वतीने प्रशिक्षण सत्र घेतले.

या चर्चेमध्ये ठळक मांडलेले मुद्दे आणि काय करावे तसेच करू नये, याची माहिती खालीलप्रमाणे आहे. या मार्गदर्शक सूचना आरोग्य व्यावसायिक आणि रूग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी तसेच आणि जे लोक संक्रमित होऊन घरामध्ये अयासोलेशनमध्ये आहेत, त्यांना उपयुक्त आहे.

 • रूग्णाचे घरामध्येच विलगीकरण केल्यामुळे रुग्णालयामधील एक खाट गंभीर रूग्णाला मिळू शकणार आहे तसेच यामुळे संक्रमणाचा प्रसार होणार नाही.
 • सौम्य आजार याचा अर्थ असा आहे की, रूग्णाच्या केवळ श्वसनमार्गाच्या वरच्या बाजूस लक्षणे दिसतात. मात्र श्वास घेण्यासाठी त्रास होत नाही किंवा धाप लागत नाही. केवळ सौम्य आजार असलेल्या रुग्णांनाच गृह विलगीकरणाची शिफारस केली जाते. अर्थात आजार सौम्य आहे की नाही याचा  निर्णय डॉक्टर घेतील.
 • गृह विलगीकरणासाठी रूग्णाला  ठेवण्यात येणा-या खोलीला  संलग्न- स्वतंत्र स्नानगृहाची  सुविधा  उपलब्ध असली पाहिजे.
 • एचआयव्ही पॉझिटिव्हसारख्या रोगप्रतिकारक क्षमता कमी होत जाणारे आजार असलेल्या रूग्णांना गृह विलगीकरणाची  शिफारस केली जात नाही आणि डॉक्टरांनी योग्य तपासणी केल्यावरच त्यांना घरात विलग ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
 • सहव्याधी असलेल्या वृद्ध रूग्णांवर  उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचे योग्य मूल्यांकन केल्यावरच गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाईल.
 • विलगीकरणात 24X7 म्हणजे पूर्णवेळ रुग्णांची काळजी घेणारी व्यक्ती असावी.
 • रूग्णांची काळजी घेणा-या व्यक्तीचा रूग्णालयाबरोबर नियमित संपर्क असला पाहिजे.
 • रूग्णाची तब्येत कशी आहे, याविषयी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वेळोवेळी नेमकी माहिती दिली गेली पाहिजे. सहव्याधी असलेल्या रूग्णांनी आपली नियमित औषधे सुरू ठेवली पाहिजेत.
 • रूग्णाने  भरपूर पाणी पिऊन चांगली विश्रांती घेतली पाहिजे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ‘अँटीपायरेटिक्स’ सेवन केले पाहिजे. (हेही वाचा: फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी सेवन करा 'या' नैसर्गिक गोष्टी यामुळे रोगाचा धोका होईल कमी)
 • घरगुती विलगीकरणमध्ये लक्षणांचे निरीक्षण करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. रुग्णांनी पल्स ऑक्सिमीटरचा वापर केला पाहिजे आणि कोणत्याही क्षणी जर ऑक्सिजन कमी होत असल्याचे दिसून आले तर त्याची माहिती त्वरित डॉक्टरांना दिली पाहिजे.
 • रूग्णांना स्नानगृह संलग्न असलेल्या खोलीत राहणे आवश्यक आहे. त्या खोलीमध्ये भरपूर हवा खेळती राहिली पाहिजे. त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांपासून दूर रहावे, विशेषतः वृद्धांनी आणि इतर सदस्यांनीही रूग्णाच्या वैयक्तिक वस्तू सामायिक करू नयेत.
 • रुग्णाने संपूर्ण वेळ तीन पदरी  वैद्यकीय मास्क  वापरला पाहिजे. हा मास्क 8 तासांनंतर बदलून टाकला पाहिजे. मास्क फेकून देण्यापूर्वी  त्याचे सोडियम हायपोक्लोराइटने निर्जंतुकीकरण करावे.
 • टेबलाचा पृष्ठभाग, दाराच्या कड्या, हँडल यासारख्या नियमितपणे स्पर्श होत असलेले पृष्ठभाग 1% हायपोक्लोराइट द्रावण किंवा फिनाइल यांनी स्वच्छ केले पाहिजे. पृष्ठभाग निर्जंतुकीकरण करण्यासाठी अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर्सचा वापर करू नये.
 • काळजी घेणा-या मंडळींनी घरातही तिहेरी पट्टी असलेला मास्क घालावा. त्यांनी मास्क  घालण्यापूर्वी आणि नंतर तसेच रूग्णाशी आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्राशी संपर्क आल्यानंतर हात  40 सेकंद साबणाने किंवा अल्कोहोल-आधारित द्रावणाने धुवावेत. हात चोळण्यासाठी साबण वापरू शकतात. काळजीवाहकाने रुग्णाशी  थेट संपर्क टाळला पाहिजे.
 • रुग्णांच्या अगदी संपर्कात असलेल्या आणि त्यामुळे  दूषित होणा-या वस्तूंचा संपर्क टाळला पाहिजे. रूग्णाला त्याच्या खोलीतच  अन्न, भोजन पुरवणे आवश्यक आहे. रुग्णाने वापरलेली भांडी आणि डिश साबण आणि डिटर्जेंटने साफ करावी.
 • रुग्णांनी शारीरिक अंतर, मास्कचा वापर, हात धुणे, स्वत: ची देखरेख करणे आणि आरोग्यसेवा प्रदात्याशी सतत संपर्क साधण्याबाबतच्या सूचनांचे पालन केले पाहिजे.
 • रोगनिदानविषयक व्यवस्थापनासाठी रुग्ण दिवसातून दोनदा मिठाच्या कोमट पाण्याने  गुळण्या  करू शकतो, काही मिनिटांसाठी नाक आणि तोंडावाटे वाफदेखील घेतली जाऊ शकते. रुग्ण  व्हिटॅमिन सी आणि जस्त–झिंक  यांच्या  गोळ्या  घेऊ शकतो.
 • रूग्णाला रेमडिसीवर देण्याचा निर्णय केवळ वैद्यकीय व्यावसायिकांनीच घेतला पाहिजे. रेमडिसीवर खरेदी करण्याचा किंवा रूग्णाला ते घरी देण्याचा प्रयत्न करु नये.
 • ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांनी मुखावाटे स्टिरॉइड्स घेऊ नयेत. जर लक्षणे सात  दिवसांपेक्षा जास्त राहिली तर मुखावाटे स्टिरॉइड्सचा अगदी  कमी डोस देण्याबद्दल केवळ डॉक्टरच निर्णय घेऊ शकतात.
 • जर रूग्णाला श्वास घेण्यासाठी  त्रास होत असेल किंवा ऑक्सिजन संपृक्तता 94% च्या खाली गेले असेल, जर रूग्णाला छातीत त्रास होत असेल किंवा त्याचा मानसिक गोंधळ उडत असेल किंवा काही करण्यास असमर्थ होत असेल,  तर रूग्णाच्या औषधोपचारासाठी  रुग्णालयाची मदत घ्यावी.
 • गृह विलगीकरणामध्ये 10 दिवस राहिल्यानंतर रुग्णाला कोणताही त्रास नसेल तर आणि तीन दिवस ताप नसल्यास रूग्णाचे विलगीकरण संपेल. घरातील विलगीकरण कालावधी संपल्यानंतर चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
 • रूग्णाची काळजी घेणारी व्यक्ती हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेऊ शकतात.
 • सीमारेषावर ‘हायपोक्सिक’ असलेल्या रूग्णांमध्ये एकदम घाबरून येणारा ताण टाळण्यासाठी आणि ऑक्सिजन संतृप्ति दोन ते तीन गुणांनी वाढविण्यासाठी प्रोनिंग करण्याची शिफारस केली आहे.