Benefits Of Night Walk: दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री जेवून कधी एकदा बिछान्यावर झोपतोय अशी इच्छा अनेकांची असते आणि आपल्यापैकी अनेकजण असे करतातही. मात्र शरीराच्या दृष्टीने विचार केला असता हे अत्यंत चुकीचे आहे. दिवसभराच्या कामामुळे तुमचे शरीर थकलेले असते ही गोष्ट मान्य आहे. मात्र रात्र भरपेट जेवल्यानंतर लगेचच अंथरूणात जाऊन झोपणे अत्यंत चुकीचे आहे. याचे अनेक गंभीर परिणाम शरीरास भोगावे लागतील.त्यामुळे रात्री जेवल्यानंतर काही वेळ का होईना पण शतपावली (Night Walk) करणे अत्यंत गरजेचे आहे.
रात्री शतपावली केल्याने शरीरास अनेक चांगले आणि हितवर्धक फायदे होतात. रात्री 10 मिनिटं का होईना पण जेवल्यानंतर थोडे चालणे गरजेचे आहे. जाणून घ्या शतपावली केल्याने शरीरास होणारे फायदे
1. पचनक्रिया सुधारते
रात्रीचे जेवण झाल्यानंतर थोडा वेळ चालल्याने खाल्लेले अन्न चांगले पचते. ज्यामुळे पित्ताचा, गॅसचा त्रास होत नाही.हेदेखील वाचा- Winter Health Tips: थंडीच्या दिवसांत बारीक मेथीची भाजी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?
2. वजन नियंत्रणात राहते
जेवल्यानंतर चालल्याने जेवणामुळे शरीरात निर्माण झालेली अनावश्यक कॅलरीज बर्न होतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते.
3. मधुमेहाचा त्रास बळावत नाही
रात्री जेवल्यानंतर 15 मिनिटं जरी चाललात तर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास बळावत नाही.
4. झोप चांगली लागते
जेवल्यानंतर चालल्यास पचनक्रिया चांगले सुधारून खाल्लेले अन्न पचते. त्यामुळे पोट दुखणे, जळजळ होणे यांसारख्या तक्रारी जाणवत नाही. परिणामी चांगली झोप लागते.
5. मेटाबॉलिजम सुधारते
रात्री जेवल्यानंतर नियमित थोडा वेळ चालल्याने तुमचा मेटाबॉलिजम रेट सुधारतो. ज्याचा तुमच्या फिटनेस आणि डाएट मध्ये देखील खूप फायदा होतो.
थोडक्यात सध्याच्या काळात सर्वाधिक उद्भवणारे आजार रात्रीच्या जेवणानंतर चालल्यास कमी होतात. त्यामुळे रोज नियमितपणे जेवल्यानंतर चालण्यासाठी प्रत्येकाने थोडा वेळ नक्कीच काढला पाहिजे. नाही का!
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही केवळ आरोग्याशी संबंधित माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी याचा आधार घेऊ नये. लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)