Sperm and egg (Photo Credits: Flickr, Maria Mellor)

लाइफसेल इंटरनॅशनल या भारतीय स्टेम सेल बँकिंग क्षेत्रातील प्रवर्तक आणि आघाडीच्या जैवतंत्रज्ञान बहुराष्ट्रीय कंपनीने सेल्फ-कलेक्शन टेस्टिंग आणि प्रीझर्व्हेशन किट्सची श्रेणी तयार केली आहे. कंपनीने प्रजनन, लैंगिक, स्त्रियांशी संबंधित आणि लहान मुलांसाठी असलेल्या आरोग्य सेवा विभागाअंतर्गत ही श्रेणी लाँच केली आहे. हे टेस्टिंग किट्स नागरिकांना समाजात टॅबू मानल्या जाणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी, टेस्टिंग करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून खास तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सँपल घेण्यापासून ते रिपोर्ट मिळेपर्यंत हे टेस्टिंग किट्स पूर्णपणे गुप्तता राखतात. त्याचप्रमाणे हे किट्स घरी सहज वापरण्यासारखे असल्यामुळे सोयीस्कर आहेत.

‘भारतात वंध्यत्वाची समस्या वाढत असून, 10 ते 14 टक्के जनते याचा सामना करत असल्याचे आयएसएआरने म्हटले आहे. गरोदर राहाण्याचा प्रयत्न करत असलेल्या अंदाजे 2.75 कोटी जोडप्यांना ही समस्या जाणवत आहे. मात्र, एक टक्क्यापेक्षा कमी जोडपी म्हणजे फक्त 2,75,000 जोडपी उपचार घेण्यास पुढे येतात. हे प्रमाण इतके कमी आहे, कारण आजही भारतात लैंगिक संबंध, प्रजननक्षमता (फर्टिलिटी) या विषयावर खुलेपणाने चर्चा होत नाही. अशा गोष्टीसंबंधित समस्यांवर बोलणे निषिद्ध मानले जाते.

त्याला अजून एका गोष्टीची साथ मिळाली आहे, ती म्हणजे लांबलेले कुटुंब नियोजन. सध्या भारतीय स्त्रिया व पुरुष करियरला प्राधान्य देऊन लग्न व कुटुंब नियोजन पुढे ढकलत आहेत, ज्यामुळे समस्या आणखी गुंतागुंतीची झाली आहे. लाइफसेल इंटरनॅशनलमध्ये अशा जोडप्यांना मदत करण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी बाजारपेठेत पहिल्यांदाच स्पर्मस्कोअर, ओव्हास्कोअर आणि इन्फरजीन्स अशाप्रकारच्या आरोग्यसेवा उपलब्ध करत जोडप्यांना प्रजनन क्षमतेबद्दल जाणून घेण्यास मदत केली जात आहे.

त्याहीपुढे जात जोडप्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्मव्हॉल्ट आणि ओव्हाव्हॉल्ट अशा प्रीझर्व्हेशन सेवा दिल्या जाणार आहेत. लाइफसेल इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक मयूर अभाया यांनी याबाबत माहिती दिली. त्याशिवाय लाइफसेलतर्फे केल्या जात असलेल्या महत्त्वाच्या चाचण्यांमध्ये स्त्रियांशी संबंधित गर्भाशयाचा कर्करोग आणि मेनोपॉज अशा समस्यांचा समावेश आहे. याआधी 2020 मध्ये जागतिक पातळीवर अंदाजे गर्भाशय कर्करोगाच्या 6,04,127 नव्या केसेस आणि 3,41,831 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. त्यातील गर्भाशयाच्या कर्करोगाच्या केसेसमध्ये भारताचा वाटा 21 टक्के होता. शिवाय, नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार 66 टक्के स्त्रियांना मेनोपॉजशी संबंधित गंभीर समस्या आहेत आणि तरीही त्याबद्दल बोलायला त्या तयार नाहीत.

या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे, की मेनोपॉजशी संबंधित समस्या जाणवायला लागल्यानंतर 35 टक्के स्त्रिया डॉक्टरकडेही जात नाहीत. स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर अशाप्रकारे चर्चेचा अभाव असल्यामुळे त्या योग्य काळजीपासून (वैद्यकीय आणि मानसिक) वंचित राहातात.

अभाया पुढे म्हणाले, ‘माझ्या मते भारतात लॅब किंवा टेस्टच्या अभावाची समस्या नाहीये, तर सोय आणि विश्वासाचा प्रश्न आहे. लाइफसेल इंटरनॅशनलमध्ये आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुविधा तयार केल्या आहेत, ज्यामुळे घरात खासगीपणा जपून हवी ती टेस्ट करता येते. त्यासाठी डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनची किंवा सँपल देण्यासाठी लॅबमध्ये जाण्याची गरज नसते. यामुळे स्त्रिया व पुरुषांना ते कुठेही असले, तरी खासगीपणे, आपल्या सोयीने टेस्ट करता येतात.’

इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शनच्या अध्यक्ष डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या, ‘हे सेल्फ टेस्ट किट्स सामाजिक टॅबूवर मात करण्यात लक्षणीय क्रांती घडवून आणतील. यामुळे स्त्रिया व पुरुषांना खासगीपणे टेस्ट करण्याचे पर्याय सहज उपलब्ध झाले आहेत. तसेच यामुळे गंभीर आजार असल्यास त्याचे वेळेवर निदान होईल आणि लगेच त्यावर उपचार करता येतील. टेस्टिंगच्या पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत खासगीपणा आणि सोयीस्करपणा ही या किट्सची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. लाइफसेलच्या या उपक्रमामध्ये पारंपरिक मानसिकता तोडण्याची आणि प्रजननक्षमता व लैंगिक आरोग्याकडे पाहाण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन बदलण्याची क्षमता आहे.’

महत्त्वाच्या सेवा-

ओवास्कोअर स्त्रियांमधील प्रजनन संप्रेरकाची (फर्टिलिटी हार्मोन) चाचणी करते. त्यामध्ये 9 बायोमार्कर्सच्या मदतीने संभाव्य अडचणी ओळखल्या जातात. स्पर्मस्कोअरच्या मदतीने पुरुषांना स्पर्मच्या आरोग्याशी संबंधित 11 निकष आणि स्पर्मच्या समस्यांशी संबंधित 14 निकषांवर प्रजननाची क्षमता जाणून घेता येते. भविष्यातील वापरासाठी स्पर्म जतन करण्याची इच्छा असलेल्या पुरुषांसाठी स्पर्मव्हॉल्ट सोपे आणि सोयीस्कर आहे.

इन्फरजीन्स- स्त्रियांसाठी ही एक महत्त्वाची टेस्ट आहे, ज्यामध्ये स्त्रियांची प्रजनन क्षमतेशी संबंधित 26 जनुकांची चाचणी केली जाते.

इन्फरजीन्स- पुरुषांसाठी असलेल्या या चाचणीत पुरुषांमधील वंध्यत्वाशी संबंधित वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाच्या 36 जनुकांची तपासणी केली जाते. जीन्सपास ही जनुकीय चाचणी वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक 2000+ जनुकांचे विश्लेषण करते आणि भविष्यात पुढच्या पिढीला आनुवांशिकतेने कोणते वैद्यकीय आजार होण्याचा धोका आहे हे कळते.

पेरीमेनोपॉज टेस्ट- ही एफडीएने प्रमाणित केलेली पहिली एएमएच रक्त चाचणी आहे. त्यात स्त्रियांच्या अंतिम मासिक पाळीपर्यंत किती वेळ आहे ते समजते आणि त्यांच्यामध्ये थायरॉइडची लक्षणे आहेत का हे ही सांगितले जाते. यामुळे त्यांना आपले आरोग्य जास्त प्रभावीपणे सांभाळता येते.

क्लॅमिडीया आणि गोनोरिया स्क्रीन- ही चाचणी स्त्रियांना दोन सर्वसामान्य लैंगिक पातळीवरून संक्रमित होणारा संसर्ग (एसटीडी) ओळखण्यास मदत करते, तर एसटीडी पॅनेल ८ सर्वसामान्य एसटीआयची चाचणी करते. (हेही वाचा: Saliva Pregnancy Test: आता लाळेद्वारे समजणार महिला गर्भवती आहे की नाही; लाँच झाली खास प्रेग्नेंसी किट)

एचपीव्ही टेस्ट स्त्रियांसाठी महत्त्वाची आहे, कारण त्यामध्ये सध्या भारतात मोठे प्रमाण असलेल्या गर्भाशयाचा कर्करोगासाठी कारणीभूत 24 जास्त जोखीम असलेल्या एचपीव्ही स्ट्रेन्सचे स्क्रीनिंग होते.

ओमेगास्कोअर-एन आणि ओमेगास्कोअर-पी चाचणीमध्ये ओमेगा-थ्री डीएचएचे मोजमाप केले जाते, कारण त्याचा बाळ व आईवर, अनुक्रमे स्तनपान करणाऱ्या आणि गरोदर स्त्रियांवर परिणाम होत असतो.

लाइफसेलचे सेल्फ-कलेक्शन किट्स सेल्फ-साइन अप पद्धतीचे आहेत व टेस्ट करण्याची इच्छा असलेल्या कोणालाही हे किट ऑनलाइन ऑर्डर करून घरी मागवता येतील. सँपल गोळा केल्यानंतर ते लाइफसेलमध्ये पाठवावे लागेल व काही दिवसातच त्याचे निष्कर्ष ऑनलाइन पाठवले जातील. अधिक मार्गदर्शनाची गरज असल्यास वैद्यकीय व्यावसायिक शोधण्यास व आवश्यक सल्ला मिळवण्यास मदत केली जाईल. या किट्सची किंमत 1500 रुपये ते 60,000 रुपयांपर्यंत आहे.