Pregnant Women प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI)

वैद्यकशास्त्र काळाच्या ओघात खूप प्रगती करत आहे. आता एका खास प्रेग्नेंसी किटची (Pregnancy Test) विक्री सुरू झाली आहे, ज्याच्या मदतीने महिला आपल्या लाळेद्वारे (Saliva) त्या गर्भवती आहेत की नाही हे तपासू शकतील. सध्या हे कीट इस्रायल, यूके आणि आयर्लंडमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ते युरोप, दक्षिण आफ्रिका आणि यूएईच्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल.

इस्रायलमधील बायोटेक कंपनी सॅलिग्नोस्टिक्सने (Salignostics) लाळेद्वारे गर्भधारणेची चाचणी करण्यासाठी हे किट तयार केले आहे. यापूर्वी ही कंपनी कोविड-19 चाचणी किट बनवत होती. त्याच धर्तीवर कंपनीशी संबंधित तज्ञांनी हे खास प्रेग्नेंसी किट तयार केले आहे. पुढील वर्षाच्या सुरूवातीस हे चाचणी किट जगातील अनेक भागातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

साधारण 2016 मध्ये इस्रायलची राजधानी जेरुसलेम येथे असलेल्या हिब्रू विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी मिळून एक स्टार्टअप सुरू केला व त्याला सॅलिग्नोस्टिक्स हे नाव देण्यात आले. कोणत्याही आजाराचे किंवा गोष्टीचे निदान सुलभ पद्धतीने करण्यासाठी काम करणे हा या प्राध्यापकांचा हेतू होता. या कंपनीने 6 वर्षांपूर्वी लाळेद्वारे गर्भधारणा ओळखण्यासाठी एक खास कीट विकसित करण्यास सुरुवात केली होती. अथक परिश्रमानंतर आणि अनेक कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर 2022 मध्ये त्याला यश मिळाले.

मागच्या वर्षी या कंपनीने असे एक किट विकसित केले, ज्याद्वारे कोणत्याही महिलेला लाळेच्या माध्यमातून सहज कळू शकते की ती गर्भवती आहे की नाही. या चाचणीनंतर काही मिनिटांतच महिला गर्भवती आहे की नाही हे सहज कळू शकते. सुरुवातीला कंपनीने तीनशे महिलांवर ही चाचणी केली, ज्यात गर्भवती आणि गर्भवती नसलेल्या महिलांचा समावेश होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कंपनीने इस्रायलच्या बाजारपेठेत हे कीट उपलब्ध करून दिले.

इस्रायलनंतर दोन दिवसांपूर्वी ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये हे कीट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जगातील इतर देशांमध्येही या किटची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने अमेरिकन मार्केटसाठी एफडीएकडे परवानगी मागितली आहे. भारतासह आशियाई देशांमध्ये हे किट लवकरच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: Heart Attack Risk: हृदयविकाराच्या झटक्याचा सोमवारी सर्वाधिक धोका; नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा)

लाळेद्वारे केली जाणारी गर्भधारणा चाचणी ही सामान्य गर्भधारणा चाचणीपेक्षा थोडी वेगळी परंतु तितकीच सोपी आहे. यातील फरक म्हणजे सामान्य चाचणी मूत्राद्वारे केली जाते, तर ही चाचणी लाळेद्वारे होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, चाचणीसाठी महिलेला किटची स्टिक तिच्या तोंडात काही सेकंद ठेवावी लागते, जेणेकरून त्यावर लाळ येईल आणि त्यानंतर तुम्हाला 10 मिनिटांत निकाल मिळेल.